विद्यार्थी देणार ‘स्वच्छता की ताली’
By admin | Published: January 16, 2017 12:15 AM2017-01-16T00:15:39+5:302017-01-16T00:15:39+5:30
प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला साद देत आता विद्यार्थी रस्त्यावर उतरणार असून घरोघरी जावून ‘स्वच्छता की ताली’ देणार आहे.
कपिल केकत गोंदिया
प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला साद देत आता विद्यार्थी रस्त्यावर उतरणार असून घरोघरी जावून ‘स्वच्छता की ताली’ देणार आहे. येथील ग्रीन गोंदिया फोरम या मंचच्यावतीने हा आगळावेगळा उपक्रम शहरात राबविला जाणार आहे. यांतर्गत नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी दर रविवारी शहरातील वेगवेगळ््या भागात जावून घरासमोर टाळी वाजवून घरच्या व्यक्तींना स्वच्छतेचे वचन देऊन त्यांच्याकडून वचन घेणार आहेत.
देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शासनाची धडपड सुरू आहे. स्वच्छतेसाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयोग अंमलात आणले जात आहेत. मात्र स्वच्छतेची ही सुरूवात स्वत: पासून करावयाची गरज असून याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. नेमकी हीच बाब हेरून शहरातील निसर्ग प्रेमी मंडळांनी मिळून ‘ग्रीन गोंदिया फोरम’ची स्थापना केली आहे. तयार करण्यात आलेल्या मंचने स्वच्छतेच्या या जनजागृतीसाठी ‘स्वच्छता की ताली’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी ते नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सोबत घेत आहेत.
‘स्वच्छता की ताली’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी दर रविवारी शहरातील वेगवेगळ््या भागांत जावून प्रत्येक घरासमोर टाळी वाजविणार आहेत. या टाळीच्या माध्यमातून ते त्या घरच्या व्यक्तींना ‘मी’ स्वत: स्वच्छता राखणार असे वचन देणार असून ‘त्या’ व्यक्तीकडूनही स्वच्छता राखणार असे वचन घेत जनजागृती करणार आहेत. अशाप्रकारे हे विद्यार्थी शहरातील प्रत्येकच घरापर्यंत जावून स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत. तर त्या व्यक्तीला आठवण रहावी यासाठी वचन देणार व घेणार आहेत.
विशेष म्हणजे हा उपक्रम पुढे जाऊन फक्त नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यां पुरताच मर्यादीत ठेवला जाणार नसून शहरातील प्रत्येकच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यात भाग घेता येणार आहे. कारण आजचा जेवढा जास्त विद्यार्थी वर्ग स्वच्छतेची स्वत:पासून सुरूवात करणार, तेवढ्याच जास्त प्रमाणात शहरातील प्रत्येकापुढे ‘स्वच्छता की ताली’ वाजविली जाणार. परिणामी तेवढ्या लोकांकडून स्वच्छतेचे वचन घेऊन स्वच्छतेच्या या उपक्रमात त्यांना सहभागी करता येणार आहे.
असे झाल्यास स्वच्छतेच्या या उपक्रमाची एक चळवळ होऊन गोंदिया शहरात सुरू करण्यात येणारा हा उपक्रम अवघ्या देशासाठी राबविता येणार. त्यातून स्वच्छतेची चळवळ देशात सुरू होणार व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना फलीत मिळणार आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जात आहेत.
- स्वच्छतेला देणार देशभक्तीची जोड
आपण ज्या देशात राहतो तो देश स्वच्छ व सुंदर असावा. जेणेकरून त्यापासून अन्य देश प्रेरीत व्हावेत हा दृष्टीकोन ठेवून ‘स्वच्छता की ताली’ या उपक्रमांतर्गत स्वच्छतेला देशभक्तीची जोड दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थी देशभक्ती गीत गात शहरात सायकल रॅली काढून निघणार आहेत. तुम्ही देशभक्त असाल तर आपल्या देशाला स्वच्छ ठेवाल हा यामागचा दृष्टीकोन आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी चौकांचौकांत व ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले जाणार आहेत. सामुदायीक जबाबदारी समजून हा उपक्रम राबविला जात आहे हे विशेष.