शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था
By admin | Published: August 20, 2014 11:36 PM2014-08-20T23:36:13+5:302014-08-20T23:36:13+5:30
विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय
विद्यार्थ्यांची गैरसोय : आरोग्यविषयक हेळसांड थांबविण्याकडे दुर्लक्ष
इटखेडा : विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय मानसिक आरोग्य सुदृढ राहत नाही, असे म्हटले जाते. तरीही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ज्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत, त्यांची अवस्था अत्यंत भयावह आहे.
स्वच्छतागृहाची दारे तुटली आहेत. वरचे छप्परही जागेवर नाही. सभोवताल काडीकचरा, विटाचे तुकडे, मातीचे ढिगारे, वाढलेले गवत निदर्शनास येते. शौचास बसण्यासाठी लावलेल्या सिट्स तुटलेल्या, कोळीष्टके, रेती, विटाच्या तुकड्यांनी सिटा बुजलेल्या, पाण्याच्या सोयीचा अभाव इत्यादीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना लघवी किंवा शौचास लागली असताना त्या स्वच्छतागृहात जाता येत नाही. स्वच्छतागृहात जाणे शक्य नसल्याने मुलांना मुत्रविकार व बध्दकोष्ठतासारखे विकार बळावण्याची शक्यता असते.
या साध्या बाबी लक्षात घेतल्यास शाळेने मुख्याध्यापक, व्यवस्थापन, शिक्षक, पालक व शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसाड करीत असल्याचे निदर्शनास येते.
शिक्षणाविषयी पालक जागरूक असले तरी ज्या शाळेत आपली मुले शिकतात. त्या शाळेतील स्वच्छतागृहे व परिसर स्वच्छ आहेत की काय याबद्दल चकार शब्द काढत नाही. विद्यार्थीही याबाबत बोलत नाही. या सर्व परिस्थितीत विद्यार्थीनीची मोठीच कुंचबना होते. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह पोषण आहार योजना कार्यान्वित केली आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी किती मुले हात धुतात, जेवण्याची ताटे स्वच्छ आहेत काय, स्वयंपाकाची भांडी, पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ आहेत काय अशा कितीतरी बाबींची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता शाळा परिसर, स्वच्छतागृहे व वर्गखोल्या स्वच्छ ठेवणे अपरिहार्य आहे. अन्यथा शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढणार एवढे मात्र निश्चित आहे. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक हेळसांड थांबवावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)