आमगाव-गोंदिया व तिरोडा रस्त्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:39+5:302021-04-02T04:30:39+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ आमगाव-गोंदिया व राष्ट्रीय महामार्ग ७५३ तिरोडा-गोंदिया या मार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारिकरणाचे काम ...
गोंदिया : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ आमगाव-गोंदिया व राष्ट्रीय महामार्ग ७५३ तिरोडा-गोंदिया या मार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारिकरणाचे काम टप्प्याटप्प्याने मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. आमगाव-गोंदिया व तिरोडा-गोंदिया या दोन्ही महामार्गाच्या बांधकामाला देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत या दोन्ही मार्गांसाठी ५५७ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय मंत्रालयाकडून आमगाव-गोंदिया या मार्गाकरिता २३९.२४ कोटी व तिरोडा-गोंदिया या २८.२ किमीच्या मार्गाकरिता २८८. १३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या दोन्ही मार्गाच्या कामाला गती मिळावी, यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ३ मार्च २०२० व १० मार्च २०२१ ला पत्रव्यवहार केला होता. त्याचीच दखल घेत यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. पटेल यांनी गडकरींचे आभार मानले आहे. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारिकरणाचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले होत. दरम्यान, बालाघाट-गोंदिया-आमगाव-देवरी-कोरची-कुरखेडा या महामार्गाचे ३८.२०० ते ५८.२७५ किमी रस्त्याच्या बांधकामाला टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली.
........
६ मे पर्यंत पूर्ण होणार निविदा प्रक्रिया
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ आमगाव-गोंदिया यासाठी २३९.२४ कोटी व राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ तिरोडा-गोंदिया या महामार्गाच्या २८.२ किमीसाठी २८८.१३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्यांच्या बांधकामाचे निविदा प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ६ मे २०२१ पर्यंत दोन्ही रस्ता बांधकामाच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरच गोंदिया ते तिरोडा व गोंदिया ते आमगाव या दोन्ही महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारिकरणाचे काम सुरू होणार आहे.