प्रवासी विमान वाहतूक सेवेचा टेकऑफचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:33 AM2021-08-13T04:33:25+5:302021-08-13T04:33:25+5:30
गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावरून गोंदिया-हैद्राबाद, गोंदिया-इंदूर ही प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी मागील तीन चार महिन्यांपासून प्रयत्न ...
गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावरून गोंदिया-हैद्राबाद, गोंदिया-इंदूर ही प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी मागील तीन चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले तीन ते चार परवाने केंद्रीय उड्डयन मंत्रालयाकडून न मिळाल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी येत्या चार पाच दिवसांत हे सर्व परवाने मिळण्याची ग्वाही खा. सुनील मेंढे यांना दिली. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवासी विमानांचा टेकऑफचा मार्ग मोकळा झाला आहे.
बिरसी विमानतळावरून सुरू होणाऱ्या व्यावसायिक उड्डाणासाठी परवाने मिळणार असून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विमान सेवेचा सुरुवात केली जाणार आहे. पूर्व विदर्भ व नजीकच्या मध्यप्रदेशाला सुद्धा या प्रवासी विमान वाहतूक सेवेचा लाभ होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे स्वत: उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मागील तीन चार महिन्यांपासून प्रवासी विमान वाहतूक सेवेला घेऊन सुरू असलेल्या चर्चेलाही आता विराम लागला आहे. केंद्रीय मंत्र्यांसह झालेल्या बैठकीत खा. सुनील मेंढे एक निवेदनही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना दिले. बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व भूसंपादन या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. महाराष्ट्र शासनासह समन्वय साधून विषय मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हवाई सेवा सुरू झाल्यास पूर्व विदर्भाचा मोठा विकास होण्यास वाव मिळणार आहे. येथील कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेचा लाभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख योजनेमुळे बिरसी विमानतळ देशाच्या इतर भागाशी हवाई वाहतुकीने जोडला जाणार आहे.