पीककर्ज न देणाऱ्या बँकांमधून शासकीय खाते बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 05:00 AM2021-06-26T05:00:00+5:302021-06-26T05:00:17+5:30
रब्बीतील धान विक्री करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. रब्बीची धान खरेदी मुदत ३० जूनपर्यंतच आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच यापुढे उघड्यावर धान खरेदी केली जाणार नसून वखार महामंडळाशी चर्चा करून गुदामे उपलब्ध केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगामात पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून, या बँकेने ७० टक्के, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ १२ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका दरवर्षी मागे राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी पीककर्जाचे वाटप करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेले शासकीय कार्यालयांचे बँक खाते बंद करून दुसऱ्या बँकेत उघडण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी (दि.२५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभसुद्धा शेतकऱ्यांना होणार आहे.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे पथदीप आणि पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल थकल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र ही अडचण दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींना थकीत वीजबिल भरण्यासाठी १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध करून देण्याचे निर्देश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
त्यामुळे ही समस्यासुद्धा आता दूर होणार आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खते, बियाणे यांचा बफर स्टॉक उपलब्ध असून, तुटवडा नसल्याचेदेखील पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
रब्बी धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ?
रब्बीतील धान विक्री करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. रब्बीची धान खरेदी मुदत ३० जूनपर्यंतच आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच यापुढे उघड्यावर धान खरेदी केली जाणार नसून वखार महामंडळाशी चर्चा करून गुदामे उपलब्ध केली जाणार आहे.
धानाची उचल न करणाऱ्या राइस मिलर्सवर कारवाई
मागील खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाई करण्यासाठी राइस मिलर्सने करार केले आहेत. पण त्यांनी अद्यापही धानाची उचल केली नसल्याने रब्बीतील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्यामुळे धानाची उचल न करणाऱ्या राइस मिलर्सवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.
लसीकरणाची गती वाढविणार
जिल्ह्यात आतापर्यंत ६० वर्षांवरील नागरिकांचे ६० टक्के, ४५ वर्षांवरील नागरिकांचे ५२ टक्के आणि १८ वर्षांवरील नागरिकांचे ५ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाचा भर आहे. शुक्रवारी जिल्ह्याला ३० हजार लसीचे डोस प्राप्त होणार आहे. त्यामुळे लसीकरण माेहिमेची गती वाढविण्यास मदत होणार आहे.
१५ जुलैपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज
डेल्टा प्लस या आजाराचे रुग्ण महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. लगतच्या मध्य प्रदेश राज्यातसुद्धा या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, तर १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सहा ऑक्सिजन जनरेशन प्लांट, ९०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर असून, पुन्हा ५०० जम्बो सिलिंडर खरेदी करण्यात येणार आहे. तर सरकारी रुग्णालयात ११०० आणि खासगी रुग्णालयात ९०० असे एकूण दोन हजार बेड सज्ज ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.