दारु दुकान बंद करा महिलांचा मशाल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:56 PM2018-02-02T23:56:49+5:302018-02-02T23:57:14+5:30
रिसामा प्रभागातील परवानाधारक दारु दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी गुरूवारी (दि.१) रात्री आमगाव पोलीस स्टेशनवर मशाल मोर्चा काढला. त्यामुळे पोलीस स्टेशनसमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : रिसामा प्रभागातील परवानाधारक दारु दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी गुरूवारी (दि.१) रात्री आमगाव पोलीस स्टेशनवर मशाल मोर्चा काढला. त्यामुळे पोलीस स्टेशनसमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करुन दारु दुकान त्वरीत बंद करण्याची मागणी केली.
आमगाव येथील रिसामा प्रभागात जुने परवानाधारक देशी दारु दुकान बंद करण्यासाठी महिलांचा मागील काही दिवसांपासून लढा सुरू आहे. या दारु दुकांनामुळे गावातील वातावरण प्रदूषित होत असून अनेक नागरिक व्यसनाच्या आहारी जात आहेत. दुकानाच्या परिसरातून जाणाऱ्या मार्गावर महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील महिला आणि नागरिकांनी दारु दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला पत्र लिहून केली. मात्र प्रशासनाने अद्यापही त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे महिलांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्याप्त आहे. सदर दुकान बंद करण्यासाठी महिलांनी यापुर्वीही आंदोलन व उपोषण केले. मात्र यानंतरही प्रशासनाने याकडे काणाडोळा केला आहे.
सदर दारु दुकान गुरुवारी (दि.१) दुकान मालकाने सुरु करताच महिलांनी रोष व्यक्त केला. रात्री ८.३० वाजता अरुण बहेकार, सिता ब्राम्हणकर, यशोदा गायधने, तृप्ती बहेकार, लक्ष्मी ब्राम्हणकर, सुमन चुटे, छबुताई उके, संजय बहेकार, तिरथ येटरे, रविदत्त अग्रवाल, रामेश्वर श्यामसुंदर, मेंढे यांच्यासह महिला-पुरुषांनी दारु दुकान कायम बंद करण्याच्या मागणीला घेवून मशाल मोर्चा काढून पोलीस स्टेशनवर धडक दिली. या वेळी महिला-पुरुषांनी सदर दारु दुकान बंद करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची मागणी केली. त्यामुळे काही वेळ पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.