पवनपूत्र मिनरल्स कारखाना बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:18 PM2018-11-25T21:18:47+5:302018-11-25T21:19:22+5:30
गोरेगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथे सुरु असलेला श्री पवनपूत्र मिनरल्स कारखाना हा आता गावात ध्वनी, वायु व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्या आरोग्यावर परिणाम पडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथे सुरु असलेला श्री पवनपूत्र मिनरल्स कारखाना हा आता गावात ध्वनी, वायु व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्या आरोग्यावर परिणाम पडत आहेत. करीता या कारखान्याला बंद करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत पारीत करण्यात आला आहे. तसेच गावकरी, जि.प. शाळा व विद्या प्रसारण हायस्कूलकडून जिल्हा परिषद सभापती विश्वजीत डोंगरे यांच्या मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्यात आले. तसेच पालकमंत्री राजकुमार बडोले यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
श्री पवनपूत्र मिनरल्स या कारखान्यात मोठमोठ्या मशीन आल्या आहेत. यात बाहेरुन काळ्या प्रकारचे मॅगनिज मिश्रीत दगड व कच्चामाल जड वाहनांनी आणला जातो. यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मॅग्नीज मिश्रीत दगड व कच्चामाल मोठमोठ्या टाक्यात धुतला जात असून यापाूसन निघणारे काळे गढूळ पाणी तलावात जात आहे. त्यामुळे तलावातील पाणी दुषित होवून निरुपयोगी झाले आहे. मॅगनिज मिश्रीत दगडांना मशीनद्वारे चुरा केले जाते व यामुळे निघणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे गावात ध्वनीप्रदूषण वाढले आहे.
दगड चुरा करण्याच्या प्रक्रियेतून निघणारी धूळ हवेत मिसळून विहिरीत जाते व घरांवर साचते. यामुळे पिण्याचे पाणी दुषित होवून आरोग्यावर परिणाम पडत आहे. सदर कारखान्याला सन २०१४ मधील ग्रामसभेत गावकऱ्यांकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येवू नये असे स्पष्ट झाले होते. तरिही गावकºयांना माहिती न करता गुप्तपणे सन २०१४-२०१५ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाºयांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले.
याचे दुष्परिणाम आज कालीमाटीतील गावकरी तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहे. यासाठी गावकऱ्यांनी कारखाना बंद करण्यात यावा असे निवेदन जिल्हा परिषद सभापती विश्वजीत डोंगरे यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. शिवाय तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करुन कारखाना त्वरित बंद करण्यात यावा असे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री बडोले यांनाही देण्यात आले आहे.