पोषण आहारातील कडधान्य पुरवठा बंद
By admin | Published: February 5, 2017 12:06 AM2017-02-05T00:06:12+5:302017-02-05T00:06:12+5:30
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांना फटका : मध्यान्ह भोजनापासून वंचित
केशोरी : राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन देण्याची योजना कार्यान्वित केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र खाद्य निगम मुंबई यांचेद्वारा कंत्राटदारामार्फत पोषण आहाराचे कडधान्य पुरवठा न केल्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शाळामधील विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित आहेत. याकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकारी लक्ष न देता चुप्पी करुन बसले आहेत.
शालेय पोषण आहाराअंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी तांदूळ, डाळ, हरभरा, वटाणा या साहित्याचे वाटप करण्याचे कार्य शासनाने कंत्राटदारांना दिले आहे. त्याप्रमाणे मुख्याध्यापक दररोज पोषण आहाराचे साहित्य येईल याची वाट पाहत असतात. काही दिवसापर्यंत शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली. मात्र गेल्या २० दिवसांपासून अजूनही पोषण आहाराचे धान्य शाळांमध्ये पोहचले नाही. परिणामी विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित राहत आहेत.
अशीच परिस्थिती राहिली तर शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा झाल्याशिवाय राहणार नाही. काही शाळांमध्ये बऱ्याच दिवसापर्यंत काटकसर करुन पोषण आहार साहित्य पुरवून मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना दिले गेले. परंतु काही अशा शाळा आहेत की त्यांचेजवळ कोणतेच साहित्य शिल्लक नसल्याने ते विद्यार्थ्याना काहीच देऊ शकत नाही किंवा कोणाकडून उसनवार साहित्य घेऊ शकत नाही. तालुक्यात परिस्थिती सारखीच आहे. शाळांतील मुख्याध्यापकांनी पर्यायी व्यवस्था करुन काही दिवस पोषण आहार सुरू ठेवला होते. आता तर त्यांच्याजवळ कोणताच पर्याय उरला नाही. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन त्वरित मध्यान्ह भोजनासाठी आवश्यक असणाऱ्या कडधान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. (वार्ताहर)