लेखा विभागाची लेखणी बंद
By admin | Published: March 17, 2017 01:30 AM2017-03-17T01:30:48+5:302017-03-17T01:30:48+5:30
समान न्याय, समान संधी या तत्वानुसार १० प्रलंबित मागण्यांसंदर्भात सुरू केलेल्या टप्पानिहाय आंदोलनात
गोंदिया : समान न्याय, समान संधी या तत्वानुसार १० प्रलंबित मागण्यांसंदर्भात सुरू केलेल्या टप्पानिहाय आंदोलनात जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी गुरूवार (दि.१५) पासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन मार्च अखेरच्या गडबडीत जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत संपूर्ण लेखावर्गीय कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून राज्य कार्यकारिणीच्या पुढील सूचनेपर्यंत हे लेखणीबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे जि.प. लेखावर्गीय संघटनेचे अध्यक्ष शैलेश बैस यांनी कळविले.
आपल्या मागण्यांसाठी दि.१० मार्चपासून काळ्या फिती लावून टप्पानिहाय आंदोलन सुरू केले आहे. दि.१५ पासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. शासन या आंदोलनाची दखल घेईल असा विश्वास संघटनेचे सुदीप देव, संजय टिकेकर, नितीन काकडे, अनिल कटकवार, गोपाल शर्मा, आनंद चर्जे, मुलचंद मडावी, प्रवीण चहांदे व इतरांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)