कालबद्ध पदोन्नतीचे द्वार बंद
By admin | Published: March 6, 2017 12:51 AM2017-03-06T00:51:30+5:302017-03-06T00:51:30+5:30
जि.प. आरोग्य विभाग अंतर्गत मागील १६ वर्षापासून आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी आरोग्य) या पदाची बिंदू नामावली मंजूर करण्यात आली नाही.
समस्या आरोग्य कर्मचाऱ्यांची : विविध अधिकारी व पदाधिकारी यांना निवेदन
गोंदिया : जि.प. आरोग्य विभाग अंतर्गत मागील १६ वर्षापासून आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी आरोग्य) या पदाची बिंदू नामावली मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे सदर पदावर पदोन्नती झालेली नाही. या पदावर पदोन्नती न झाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची पुढील पदावरील पदोन्नतीची श्रृंखला कायमची बंद झाली आहे. सदर पदाची बिंदू नामावली मंजूर करुन घेण्यासाठी आरोग्य विभाग उदासीन असून आतापर्यंत आरोग्य आस्थापनेने कोणताही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुढील पदोन्नतीचे द्वार बंद आहेत.
कालबद्ध पदोन्नतीकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पुस्तिका जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये तीन ते चार वर्षे पडून असतात. तीन ते चार वर्षांपर्यंत पुस्तिका न तपासता, तीन ते चार वर्षांनी आक्षेप लावून कालबद्ध पदोन्नतीकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचप्रकारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा पैसा वित्त विभागाच्या जीपीएफ खात्यावर जमा झालेला नाही. तसेच सन २०१४ पासून जिपीएफची रक्कम खात्यावर जमा झाल्याची पावती आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही.
जानेवारी व फेबु्रवारी २०१७ ला जि.प. प्रशासनाने डिसेंबर २००५ च्या स्थितीवर आधारित बिंदू नामावलीनुसार खालील विभागाचे पदोन्नती केलेली आहे. यात मुख्याध्यापक माध्यमिक, पंचायत विभाग, स्वापत्य सहाय्यक, विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ लेखा अधिकारी (वित्त विभाग) यांचा समावेश आहे. परंतु हेतुपुरस्परप आरोग्य विभागातील आरोग्य सेवक यामधून आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सेविका यामधून आरोग्य सहाय्यिका यांची पदोन्नती झालेली नाही.
डिसेंबर २०१५ च्या स्थितीवर आधारित बिंदू नामावलीनुसार इतर विभागाची पदोन्नती होऊ शकते. मात्र आरोग्य विभागातील पदोन्नती का होऊ शकत नाही, याचे उत्तर प्रशासनाने आरोग्य संघटनेला द्यावे? पदोन्नतीबाबत असा दुजाभाव का? या प्रकारामुळे पदोन्नतीबाबद आरोग्य कर्मचारी संभ्रमावस्थेत आहे.
सदर चारही मुद्यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने २५ मार्च २०१७ पर्यंत निराकरण करुन आरोग्य सहाय्यक व सहाय्यिका पदाची पदोन्नती करावी.
तसेच विस्तार अधिकारी आरोग्य पदाची बिंदू नामावली मंजूर करावी. चारही मुलांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन विलंबास कारणीभूत असणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हा शाखा (२५७/८९), गोंदिया नर्सेस संघटना यांची मागणी आहे.
सदर चारही मागण्या विहीत मुदतीत जिल्हा परिषद प्रशासनाने निराकरण केले नाही तर २ एप्रिल २०१७ च्या पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुकाअ, जि.प. अध्यक्ष यांना दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)