तिरोडा रेल्वे स्थानकावर कोळसा चोरी सुरूच
By admin | Published: November 23, 2015 01:37 AM2015-11-23T01:37:06+5:302015-11-23T01:37:06+5:30
तिरोडा रेल्वे स्थानकावर थांबलेल्या मालगाड्यांमधून दगडी कोळशाची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे दुर्लक्ष : महिलासुद्धा चढतात कोळशासाठी मालगाडीवर
गोंदिया : तिरोडा रेल्वे स्थानकावर थांबलेल्या मालगाड्यांमधून दगडी कोळशाची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी चोरट्यांना पकडतात व नंतर सोडून देतात. या प्रकारामुळे मालगाड्यांमधून दगडी कोळशाच्या चोरीस वावच मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी तिरोडा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दगडी कोळशाने भरलेली मालगाडी थांबलेली होती. त्या गाडीच्या डब्यावर दोन इसम चढून भराभर दगडी कोळसा खाली फेकत होते. यात एक महिलासुद्धा होती. या प्रकाराकडे तेथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष होते. मात्र रेल्वेचे कर्मचारी या घटनेपासून अनभिज्ञच होते. हीच बाब पुन्हा आज अनुभवयाला मिळाली. मात्र रेल्वेचे पोलीस कुठे बेपत्ता झाले होते, हे कुणालाही कळले नाही.
अशीच घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. त्यावेळी चोराला पकडण्यात आरपीएफला यश आले होते. या प्रकाराबाबत गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे इन्चार्ज बी.एन. सिंग यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले होते की, एक व्यक्ती एका पोतीमध्ये गाडीखाली पडलेली कोळशाची चुरी उचलून जमा करीत होता. ही फारशी मोठी बाब नाही, मात्र तरी त्याला रेल्वे अॅक्टनुसार ताब्यात घेण्यात आले होते. परंतु गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
जर पोलीसच चोरीसारख्या घटनांना फारशी मोठी बाब समजत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. माणसच काय महिलासुद्धा मालगाडीवर चढून भराभर कोळसा खाली फेकताना दिसत आहे. यात काही अल्पयवयीन मुलांचाही समावेश आहे. वारंवार होणाऱ्या कोळसा चोरीच्या प्रकारात आरपीएफही दुर्लक्ष करून चोरट्यांना पकडत नाहीत. (प्रतिनिधी )
सुरक्षा दल वाढवावे
मालगाडीवरून दगडी कोळशाची चोरी करणारे पाकीटमारीसुद्धा रेल्वे स्थानक व प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये करतात. कोळशाची चोरी करण्याची संधी न मिळाल्यास हेच चोरटे प्रवासी गाड्यांमध्ये चढून संधी मिळताच प्रवाशांचे पाकीटही मारतात, असे काही जणांनी सांगितले आहे. प्रवाशांचे नुकसान व रेल्वे प्रॉपर्टीची हानी वाचविण्यासाठी तिरोडा रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा दल वाढविण्याची मागणी आहे.