विद्यार्थ्यांना थंडीचा फटका, उन्हाचा चटका
By admin | Published: January 17, 2016 01:39 AM2016-01-17T01:39:33+5:302016-01-17T01:39:33+5:30
आपल्या शाळेचे नाव उंचावले जावे म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग ऊन, थंडीचा तमा न बाळगता तब्बल २ ते ३ महिने राबताना दिसतात.
विजय मानकर सालेकसा
आपल्या शाळेचे नाव उंचावले जावे म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग ऊन, थंडीचा तमा न बाळगता तब्बल २ ते ३ महिने राबताना दिसतात. पण त्यातून जिल्हास्तरावर निवडल्या जातात ते तालुक्यातील मोजकेच खेळाडू. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचा अभ्यासाला द्यायचा बराच वेळ वाया जात आहे.
उद्घाटनाचा दिवशी सूर्योदयासोबतच खेळाडू विद्यार्थी कडकडत्या ठंडीमध्ये आपल्या शाळेचा झेंडा घेवून निघतात. कितीही थंडी असली तरी खेळाचा गणवेश अंगात घालून पूर्ण जोशात जयघोष करीत क्रीडास्थळाच्या गावाकडे मार्च करीत जातात. संपूर्ण चमू पूर्ण आवेशात असून आपण निश्चित विजयी होऊन येणार असा त्यांचा विश्वास असतो. आयोजनस्थळी चारही दिशेने अशा चमूंचे आगमन होतानाचे दृश्य बघून गावकरीसुध्दा भारावून जातात. गावात आयोजनाला आपण ही हातभार लावावा, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊन त्या भावनेला मूर्तरुप देण्यास प्रारंभ करतात. कोणी गावची साफसफाई तर कोणी चुना पाणी लावण्यात स्वत:ला व्यस्त करून घेतात. गावातील वातावरण सुध्दा क्रीडा महोत्सवामुळे उत्साहवर्धक असते. मुुलांच्या खेळाला बघण्यासाठी गावातील आबाल-वृध्द सर्वच मैदानात येतात. मजुरी करणारे महिला-पुरुष सुध्दा आपल्या कामावरून सुटी घेऊन खेळाचा आनंद घेण्यासाठी येतात.
उद्घाटनाची वेळ आल्यानंतर संघ शिक्षक आपआपल्या खेळाडूंना झेंडा आणि शाळेच्या नावाची पाटी घेऊन मैदानात ओळीचे शांततेत बसायला लावतात. दुसरीकडे आयोजक उद्घाटन सोहळ्याच्या पाहुणे मंडळीची वाट बघत असतात. कोणी दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात व्यस्त असतात. दुसरीकडे विद्यार्थ्यांना या गोष्टीशी काही देणेघेणे नसते. पहाटेपासून उठून आलेले विद्यार्थी अस्वस्थ होतात आणि शिक्षक त्यांना गुराख्यासारखे रोखून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात.
सहनशीलतेचा अंत...
या खेळ महोत्सवाच्या उद्घाटन सत्रासाठी ठरविलेल्या पाहुण्यांची वाट पाहणे म्हणजे एक मोठे दिव्य काम असते. एक तास, दोन तास, तीन-तीन तास पाहुण्यांची वाट पहावी लागते. एकीकडे खेळाडू विद्यार्थी प्रतिक्षा करीत बसले असतात तर दूसरीकडे नेते मंडळी आपल्या दरबारात गप्पागोष्टी करीत असतात. जेव्हा मुलांची सगळी सहनशक्ती संपलेली असते तेव्हा पाहुण्यांचे आगमन होते. आयोजक मंडळी परंपरेनुसार स्वागत सोहळा, प्रास्ताविक, अहवाल, गावातील समस्या इत्यादींचा पाढा वाचतात. नेते मंडळीना बोलण्याची वेळ आली की एकदोन वाक्य खेळाबद्दल बोलले की मग आपल्याला श्रेय मिळावे या उद्देशाने राजकारणाच्या भाषेत बोलतात. विरोधी पक्षाकडे बोट दाखविण्याचे काम ही तेवढ्याच जोशात होते.