सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले, औषधांच्या मागणीत झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:08+5:30
उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लोकांवर वातावरणाचा परिणाम झाला. घरोघरी सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे आढळणारे रुग्ण घरोघरी दिसू लागली आहेत. कोरोनाही पाय पसरू लागला आहे. आपल्याला कोरोना तर झाला नाही, या धास्तीत लोक आहेत. आजघडीला मेडिकलमध्ये सर्दी, खोकल्याची औषधी घेणारे लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत.
गोंदिया शहराबरोबर ग्रामीण भागातही व्हायरल फिव्हरचा जोर असल्याने गावागावात सर्दी-तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रुग्णांची सुध्दा सध्या शासकीय रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे डॉक्टरांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
शासकीय रूग्णालयातील ओपीडी वाढली
- साधी सर्दी, खोकला किंवा ताप रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याने शासकीय रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे.
- ताप असलेल्या व्यक्तीने घरच्यांपासून वेगळे राहावे, लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून घ्यावी, आरोग्य यंत्रणेचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावा.
तर करा कोरोना चाचणी
सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळताच कोरोनाची चाचणी करण्यासाठी लोकांनी पुढे यावे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वेच्छेने लोक रुग्णालयात आले तरच त्यांची चाचणी केली जाते. दिवसाकाठी दररोज १००० लोकांची चाचणी गोंदिया जिल्ह्यात केली जात आहे.
बदललेले वातावरण हेही कारण
सद्यस्थितीत ऊन, पाऊस, मधातच थंडी असा सतत बदल वातावरणात होत असल्यामुळे या वातावरणाचा फटका मानवी शरीरावर पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.
दहापैकी आठ रुग्ण सर्दी खोकल्याचे
सध्या आमच्या मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी येणाऱ्या दहापैकी आठ लोक हे सर्दी, खोकलाची औषधी घेण्यासाठी येत आहेत. खोकल्याच्या औषधांमध्ये सर्वाधिक मागणी अडुळसा या औषधीला आहे.
- राजेश अग्रवाल, मेडिकल चालक आमगाव.
आमच्या मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी येणाऱ्या सर्वाधिक चिठ्ठी ह्या सर्दी, खाेकला या औषधांच्याच आहेत. डॉक्टरांच्या आलेल्या चिठ्ठींमध्ये दहापैकी सात ते आठ चिठ्ठी ह्या खोकला आणि सर्दीच्या औषधांच्या असतात.
- रामभाऊ पाऊलझगडे, मेडिकल चालक ठाणा