सामूहिक विवाह सोहळे आर्थिक बचतीचे माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:27 PM2018-04-17T22:27:12+5:302018-04-17T22:27:12+5:30
आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. अशा आयोजनाकरिता समाजातील जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच अशा सामूहिक सोहळ्यातून समाजातील लोकांची आर्थिक बचत होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.
साखरीटोला येथे युवा कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने रविवारी (दि.१५) जि.प. हायस्कूलच्या पटांगणावर कुणबी समाजाच्या १४ वर-वधू जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, माजी खा. नाना पटोले, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ. राजेंद्र जैन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प. सदस्य सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, नरेश रहिले, सालेकसाचे उपसभापती दिलीप वाघमारे, देवरीच्या सभापती सुनंदा बहेकार, सातगावचे सरपंच संगीता कुसराम, गणेश शिक्षण संस्थेचे संस्थापक विजय बहेकार, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे सभापती रमेश ताराम, हुकुमचंद बहेकार यांच्यासह इतर समाजबांधव, महिला, पुरुष, युवक व वऱ्हाडी बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी खा. नाना पटोले यांनी, या देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या घामाचा दाम मिळायला हवा. त्यांनी शेतात रोवलेल्या बियांचा खर्च निघत नाही आणि त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. सरकारच्या उदासिनतेमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकरिता समाजाने व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आता लढणे गरजेचे आहे, असे म्हटले. तर आ. गोपालदास अग्रवाल यांनी समाजाचे महत्व पटवून देताना संघटीत समाजासमोर सरकारही झुकते आणि या माध्यमातून आपला विकास साधता येतो, असे सांगितले.
या वेळी विवाहबद्ध झालेल्या १४ वर-वधू जोडप्यांना मनोहरभाई पटेल अॅकादमी, प्रताप मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांच्यातर्फे भेटवस्तू वाटप करुन उपस्थित अतिथींनी सुखी सांसारिक जीवनाबद्दल आशीर्वाद दिले. प्रास्ताविक युवा कुणबी समाज समितीचे अध्यक्ष देवराम चुटे यांनी मांडले. संचालन प्रभाकर दोनोडे यांनी केले. आभार सचिव पृथ्वीराज शिवणकर यांनी मानले.