जिल्हाधिकारी,सहाय्यक आयुक्त पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:00 AM2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:22+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना मागील दोन दिवसांपासून सर्दी आणि थोडा खोकला असल्याने सोमवारी त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची टेस्ट करुन घेतली. मंगळवारी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या होम आयसोलेटेड झाल्या आहेत. मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्या बैठका आणि जिल्ह्याचे दौरे करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून यातून आता विविध शासकीय कार्यालय सुध्दा सुटलेले नाही. मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना सुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दोन्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.
जिल्हाधिकाऱ्यांना मागील दोन दिवसांपासून सर्दी आणि थोडा खोकला असल्याने सोमवारी त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची टेस्ट करुन घेतली. मंगळवारी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या होम आयसोलेटेड झाल्या आहेत. मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्या बैठका आणि जिल्ह्याचे दौरे करीत आहे. अशात आता त्याच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांची जबाबदारी कोण पार पाडणार याकडे लक्ष लागले आहे. पाच दिवसांपूर्वीच अप्पर जिल्हाधिकारी सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आले सध्या ते मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुध्दा करण्यात आल्याची माहिती आहे. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार आणि बुधवारी (दि.९) हे दोन दिवस कार्यालय बंद ठेवून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना ज्या मेडिकल कॉलेजमध्ये स्वॅब नमुन्यांची तपासणी केली जाते. त्याच प्रयोगशाळेतील ८ टेक्नीशीयन कोरोना पॉझिटिव्ह आले. मेडिकलचे सात डॉक्टर आणि १२ परिचारिकांना सुध्दा कोरोनाची लागण झाली असल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांनी सांगितले.
मनुष्यबळाअभावी चाचण्यांवर परिणाम
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे चाचण्यांकरिता नागरिकांची गर्दी मेडिकलमध्ये वाढत आहे. मात्र या ठिकाणी स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याने अनेकांना चाचणी न करताच परत जावे लागत आहे. या स्वॅब घेणाऱ्यांच कोरोनाची लागण झाली असल्याने केवळ दोन तीन तंत्रज्ञ असून त्यांच्या भरवश्यावर सध्या काम सुरू आहे.त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
कोरोना बाधितांचा मेडिकलमध्ये मुक्त वावर
मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी केले जातात. कोरोना बाधितांचा त्वरीत शोध घेण्यासाठी अँटीजेन टेस्ट केली जात आहे. मात्र बरेच या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर परत मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणीकरिता येतात. हे पॉझिटिव्ह रुग्ण सुध्दा स्वॅब देण्यासाठी तपासणीसाठी येणाऱ्या इतर रुग्णांसह रांगेत लागतात. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मेडिकलच्या परिसरात मुक्त वावर असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.