मोहारे कुटुंबावरील संकटाला धावून आले जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 05:00 AM2021-06-18T05:00:00+5:302021-06-18T05:00:09+5:30
‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी याची दखल घेत संकटातील मोहारे कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय प्रतिसाद देत असून, एकूण २० अधिकाऱ्यांकडून दरमहा ५०० रुपयेप्रमाणे दर महिन्याला १० हजार रुपये पीडित मोहारे कुटुंबाला देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली तरी मोहारे कुटुंबीयांना दरमहा दहा हजार रुपयांची मदत सुरूच राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील मुंडिपार येथे सर्पदंशाने माय-लेकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबात दोन बहिणींच्या वाट्याला अंधार आला. त्यात त्यांच्यावर दिव्यांग वडिलांची जबाबदारी शिक्षण घेण्याच्या वयात दोन्ही बहिणींवर आली. ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी याची दखल घेत संकटातील मोहारे कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय प्रतिसाद देत असून, एकूण २० अधिकाऱ्यांकडून दरमहा ५०० रुपयेप्रमाणे दर महिन्याला १० हजार रुपये पीडित मोहारे कुटुंबाला देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली तरी मोहारे कुटुंबीयांना दरमहा दहा हजार रुपयांची मदत सुरूच राहणार आहे.
१३ जूनला मोहारे कुटुब एकाच ठिकाणी जमिनीवर झोपले असताना दांडेकर सापाने सतवंती मोहारे आणि मुलगा दीपक मोहारे यांना दंश केल्याने त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबात दोन बहिणी आणि त्यांचे दिव्यांग असलेले वडील राहिले. त्यामुळे पीडित मोहारे कुटुंबातील त्या दोन बहिणींचे भविष्य संकटात आले. लोकमतने या घटनेची सविस्तर बातमी १७ जूनच्या अंकात प्रकाशित केली. लोकमतमधील बातमी वाचून जिल्हाधिकारी राजेश खवले यांचे मन हेलावले. यानंतर त्यांनी लोकमतमधील बातमी विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि फेसबुुकवर शेअर केली. तसेच मोहारे कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. याला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमत प्रतिनिधीला फोन करून माेहारे कुटुंबीयांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल आभार मानले. तसेच या कुटुंबाला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
२० अधिकाऱ्यांनी उचलला मोहारे कुटुंबीयांचा भार
- मोहारे परिवाराला दर महिना ५०० रुपये प्रमाणे २० अधिकाऱ्यांकडून एकूण १० हजार देण्यात येणार आहेत. यामध्ये अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव, उपविभागीय अधिकारी तिरोडा, उपविभागीय अधिकारी गोंदिया, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड गोंदिया, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा नियोजन अधिकारी, प्रकल्प अधिकारी आयटीडीपी देवरी, जिल्हा हिवताप अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
इतर संघटनाही सरसावल्या
- मोहारे कुटुंबाला सध्याच्या अडचणीतून सावरण्यासाठी जिल्हा आणि तालुक्यातील इतर सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. यात लोकमत सखी मंच, सालेकसा, शिक्षक संघटना आणि समाजसेवकांचा समावेश आहे. मोहारे कुटुंबाची व्यथा मांडून मदत केल्याबद्दल लोकमतचे आभार मानले.
दोन बहिणींच्या शिक्षणाची व्यवस्था हाेणार
- आईचे छत्र हरपल्याने मोहारे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यातच दोन बहिणींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हा प्रश्नसुध्दा सोडविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून या दोन्ही बहिणींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी यांच्या हृदयामध्ये माणुसकीचा झरा अजूनही जिवंत आहे, हे आज या प्रसंगातून दिसून आले. उदात्त कार्यासाठी पुढे आल्याबद्दल सर्वांचे आभार मानून भविष्यात एखादे कुटुंब अडचणीत सापडलेले वाटेल तेव्हा इतर आणखी अधिकारी पुढे येऊन मदतीचा हात पुढे करतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया.
- राजेश खवले, जिल्हाधिकारी, गोंदिया