जिल्हाधिकारी साहेब, कडक निर्बंध कोणा-कोणासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:49+5:302021-05-29T04:22:49+5:30
सालेकसा : कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु या कडक ...
सालेकसा : कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु या कडक निर्बंधामध्ये राज्यात कलम १४४ लागू असताना जवळपास सर्वच पक्षांचे नेते आणि राजकारण्यांनी वाटेल तेव्हा गर्दी उभी करून उद्घाटन व भूमिपूजन करण्याचा सपाटा चालविला असून कडक निर्बंधांची पायमल्ली करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य मजूर आणि छोटे-छोटे व्यापारी यांचे हाल बेहाल झालेले दिसत आहे. अशात समाजातील एक मोठा वर्ग नाराज आहे. जिल्ह्याचे प्रशासनिक प्रमुख म्हणून या भेदभावपूर्ण व्यवहारावर जिल्हाधिकारी गप्प बसून का आहेत, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी मांडला आहे.
राज्यात ३१ मेपर्यंत कडक निर्बंध कायम असून तोपर्यंत जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू आहे. अशात जिल्ह्यात ५ पेक्षा जास्त लोक एकत्रित येण्यास मनाई आहे. तसेच कसलेही सामूहिक सोहळे किंवा गर्दी वाढविणारे कार्यक्रम करण्यावर बंदी आहे. लॉकडाऊन काळात रोज परिश्रम करून जीवन जगणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. त्याचबरोबर छोटे-छोटे व्यवसाय करून रस्त्यावर जीवनावश्यक वस्तू विकून आपल्या घराचा गाडा चालविणारे लाचार झालेले आहेत. तरीही मुकाट्याने शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. आपल्या पोटापाण्यासाठी कोणी गरीब माणूस रस्त्यालगत काही दैनंदिन गरजेच्या वस्तू विकायला बसला की त्याचे दुकान उचलून टाकण्यात येते.
याचवेळी विविध राजकीय पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आपल्यासोबत ५-१० लोकांना घेऊन कुठेही उद्घाटन किंवा भूमिपूजन सोहळा आयोजित करतात. एवढेच नाहीतर, त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची गर्दीसुद्धा वाढवितात. अशात या लोकांसाठी निर्बंधाचे नियम नाहीत का, असा प्रश्न छोटे व्यापारी विचारीत आहेत.
या लॉकडाऊन काळात काही दबंग स्वरूपाचे लोक आपले काम बिनधास्त करतात. तर काही असामाजिक तत्त्व कोरोना नियमाचा पाढा वाचत सर्वसामान्यांना त्रास देण्याचे कामसुद्धा करीत आहेत. अशात जिल्हा प्रशासनाने सगळ्यांसाठी कठोर निर्बंध पाळायला बाध्य करावे, अशी मागणी छोट्या व्यापाऱ्यांनी केली आहे.