कोरोनामुक्त गावासाठी लसीकरणासाठी पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:22+5:302021-06-01T04:22:22+5:30
बोंडगावदेवी : ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव कोरोनामुक्त झाला आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ...
बोंडगावदेवी : ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव कोरोनामुक्त झाला आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने स्वत: सुरक्षित राहून गाव सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य द्यावे, कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी स्वत: हून लसीकरण करणे गरजचेे आहे. आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी समस्त ग्रामवासीयांनी पुढे यावे, असे प्रतिपादन स्थानिक सरपंच प्रतिमा बोरकर यांनी केले.
येथील जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्यात लसीकरणादरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने लस घेणाऱ्यांसाठी चहा-बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांशी हितगुज साधताना त्या बोलत होत्या. गावातील जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यात कोरोना लसीकरणासाठी शिबिर घेण्यात आले होते. लसीकरणादरम्यान लस घेणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने बैठक व्यवस्था करून देण्यात आली होती. याप्रसंगी सरपंच प्रतिमा बोरकर, तंमुस अध्यक्ष ॲड. श्रीकांत बनपूरकर, डॉ. कुंदन कुलसुंगे, कृष्णा खंडाईत, गजानन बोरकर, शांतीप्रकाश पालीवाल, सहकारी अधिकारी प्रशांत गाडे, आनंद पुस्तोडे उपस्थित होते. गावात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना ध्वनिक्षेपणाद्वारे जनजागृती केली जात आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. मनात कोणतीही शंका बाळगू नये, असा हितोपदेश याप्रसंगी सरपंच प्रतिमा बोरकर यांनी केला. गावासह परिसरातील ५० जणांना कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले. लसीकरणासाठी डॉ. कुंदन कुलसुंगे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवक पवन साखरे, आरोग्य सेविका प्रतिभा राऊत, स्वाती लोहारे, आशा सेविका वर्षा रामटेके, सारिका रंगारी यांनी सहकार्य केले.