मनात शंका न बाळगता लसीकरणासाठी पुढे या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:31+5:302021-03-13T04:53:31+5:30
बोंडगावदेवी : कोरोना साथीवर विजय मिळविणे सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी स्वत: सावधगिरी पाळणे ...
बोंडगावदेवी : कोरोना साथीवर विजय मिळविणे सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी स्वत: सावधगिरी पाळणे गरजेचे आहे. घराबाहेर निघताना मास्क लावणे आवश्यक आहे. सुरक्षित अंतर ठेवून गर्दी टाळावी. कोरोना साथीवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक स्वरुपात लस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती व शंका न बाळगता लस घेण्यासाठी तत्परतेने पुढे येऊन लसीकरण करावे, असे प्रतिपादन चान्ना-बाक्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉॅ. श्वेता कुळकर्णी यांनी केले.
बुधवारी (दि.१०) कोरोना लसीकरणाचा शुभारंभ ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देऊन करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती. कोरोना लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळकर्णी यांनी तालुक्यातून सर्वप्रथम अर्जुनी-मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात यापूर्वीच कोरोना लस घेतली होती. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा चढता उतरता क्रम सुरू आहे. यासाठी समस्त नागरिकांनी सजग राहून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५९ वयोगटांतील नागरिकांनी नावनोंदणी करून कोरोना लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे. लसीकरणामुळे कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असे त्यांनी सांगीतले. कोरोना लसीकरणासाठी डॉ. कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात डॉ. कुंदन कुलसुंगे, डॉ. पल्लवी नाकाडे, पवन साखरे, रवी दोनोडे, रवीना कोडापे, सोनाली काठवले, रेखा कोसरे, रंजना राखडे आदी आरोग्य कर्मचारी सहकार्य करत आहेत.