मनात भीती न बाळगता लसीकरणासाठी समोर यावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:30 AM2021-03-23T04:30:44+5:302021-03-23T04:30:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवेगावबांध : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी यासारखी लक्षणे १-२ दिवस जाणवतात, ती सर्वसामान्य आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी यासारखी लक्षणे १-२ दिवस जाणवतात, ती सर्वसामान्य आहेत. याबाबत अनेक अफवा व गैरसमजसुद्धा पसरले आहेत. लस घेतल्याने ताप येतो, असे समजून बरेच नागरिक लसीकरणाची भीती व गैरसमज बाळगत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी ग्रामीण भागातील बरेच नागरिक लस घेण्यास धजावत नाहीत. मात्र, असे काहीही नसून, नागरिकांनी मनात भीती न बाळगता लसीकरणासाठी समोर यावे, असे आवाहन गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष बोदेले यांनी केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, गोठणगाव अंतर्गत कुंभीटोला व बाराभाटी उपकेंद्रात १५ मार्चपासून कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ६० वर्षांवरील सर्व लाभार्थी तसेच ४५ ते ५९ वर्षांवरील ज्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह यासारखे आजार असल्यास त्यांना लस देण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, गोठणगाव कार्यक्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाबाबत कुठल्याही प्रकारचे गैरसमज, मनात भीती न बाळगता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सकारात्मक लसीकरण करून घ्यावे, असे डॉ. बोदेले यांनी कळविले आहे.
......
लस घेतल्यानंतर ही घ्या काळजी
लस घेतल्यावर ताप व अंगदुखी हे सर्वसामान्य परिणाम साधारणपणे दिसतात व १ ते २ दिवस राहतात. लसीकरण केंद्रावर दिल्या जाणाऱ्या औषधाने आपल्याला बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षणे दिसत नाहीत. दरम्यान, वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरिराची रोगप्रतिकारकशक्ती कार्यान्वित झाल्याचे लक्षण आहे. पहिला डोस घेतला की, साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा. लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी यावे उपाशीपोटी येऊ नये. लसीकरण केंद्रावर कमी-जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्कीटे, कोकम सरबत किंवा लिंबू सरबत घेऊन जावे. तसेच जाताना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन जावे. ४५ ते ५९ वयोगटातले व्याधीग्रस्त व ६० वर्षांवरील सर्वांनी हे लसीकरण करून स्वतःला व आपल्या परिवाराला कोरोना संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लस घेणे गरजेचे असल्याचे डॉ. बोदेले यांनी कळविले आहे.