समाज विकासासाठी एकत्र या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:05 AM2018-03-07T01:05:20+5:302018-03-07T01:05:20+5:30
कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण प्रवाहात येवून उच्च शिक्षण घेत मोठ्या पदावर विराजमान होवून समाज, गाव व आई-वडीलांचे नाव मोठे करावे.
ऑनलाईन लोकमत
सिरपुरबांध : कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण प्रवाहात येवून उच्च शिक्षण घेत मोठ्या पदावर विराजमान होवून समाज, गाव व आई-वडीलांचे नाव मोठे करावे. असंघटीत, भरकटलेला कुणबी समाजातील वाईट रुढी, परंपरा यावर आळा घालून महिला-पुरुषांनी समाजाच्या विकासाकरिता एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राम गायधने यांनी केले.
कुणबी समाज संघटनेच्यावतीने मौजा फुक्कीमेटा येथे समाज प्रबोधन सभेतंर्गत आयोजित तुकाराम महाराज बीज महोत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण भुरे, आर.एस.डोये, गणेश मुनीश्वर, भरतराज हलमारे, संतोष भुते, बबलू डोये, सरपंच विनोद भांडारकर, लेखराम हुकरे, निलकंठ भुते, गजानन शिवणकर, कृष्णा ब्राम्हणकर, पिंटू मुनेश्वर उपस्थित होते.
याप्रसंगी समाज बांधवांना संघटनेचे महत्व, गरज व सहकार्य यावर गणेश मुनेश्वर, भरतलाल हलमारे, विनोद भांडारकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रामेश्वर बहेकार यांनी मांडले. संचालन तवाडे यांनी केले. आभार मेघनाथ बहेकार यांनी मानले.
कार्यक्रमाला कुणबी समाजातील महिला, पुरुष व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समाजबांधवांनी सहकार्य केले.
समाजातील नवनिर्वाचीत सरपंचांचा सत्कार
या कार्यक्रमाचे निमित्त साधून कुणबी समाजातील नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यात शिलापूर येथील सरपंच रोशनी राजेश भुते व फुक्कीमेटाचे सरपंच विनोद भांडारकर यांचा शाल व श्रीफळ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.