दिलासा... जिल्ह्यावरील प्राणवायूचे संकट तुर्तास टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:12+5:302021-05-01T04:28:12+5:30
गोंदिया : कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे मधल्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण ...
गोंदिया : कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे मधल्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. सद्यस्थितीत जिल्ह्याला दररोज साडेपाच मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असून, भिलाई व नागपूर येथून ८.५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा हाेत आहे. १५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा राखीव ठेवण्यात आला. त्यामुळे तूर्तास तरी ऑक्सिजन तुटवड्याचे संकट टळले आहे.
जिल्ह्यात दररोज पाचशे ते सहाशे कोरोना बाधितांची नोंद होत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली. मात्र, राज्यात एकाच वेळी सर्वत्र ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होत होती. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा करून जवळपास ४० मेट्रिक ऑक्सिजन अडचणीच्या कालावधीत उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे या अडचणीवर बऱ्याच प्रमाणात मात करता आली. मेडिकल कॉलेजच्या आवारात १३ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मेडिकलला लागणाऱ्या ऑक्सिजनची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होणार आहे. गोंदिया मेडिकल कॉलेज आणि केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजनचे २०० बेड असून, त्यांना यासाठी दररोज ऑक्सिजन लागत असून, मेडिकलकडे सध्या ८०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत, तर शहरात २१ कोविड हॉस्पिटल असून, त्यांना दररोज ५५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे. मात्र, त्यांच्याकडे ऑक्सिजन सिलिंडरची संख्या कमी असल्याने ऑक्सिजनच्या ५० बेडची सुविधा असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांना बेडच्या चारपट ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांचा ऑक्सिजनचा साठा राखीव ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुर्तास जिल्ह्यावरील प्राणवायूचे संकट टळले आहे.
...............
हवेतूृन ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट उभारा
जागतिक आरोग्य संघटनेने मे, जून महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सर्वच कोविड रुग्णालयांना बेडच्या चारपट ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ऑक्सिजन प्लांट उभारण्यास सांगितले असून, गोंदिया बाहेकर हॉस्पिटलमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांट उभारण्यात येत आहे.
..............
मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन राखण्याचा प्रयत्न
कोविड काळात ऑक्सिजनची समस्या निर्माण हाेऊ नये, यासाठी दररोज मागणी आणि होणार पुरवठा यांचे नियोजन केले जात आहे. तसेच मागणीपेक्षा अतिरिक्त साठा कसा उपलब्ध राहील, यााठी जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.
...........
कोट
कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या निर्माण होणार नाही, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व खासगी कोविड रुग्णालयांना जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी.