दिलासा...सलग दुसऱ्या दिवशी बांधितांची संख्या शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:24+5:302021-07-18T04:21:24+5:30
गोंदिया : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शून्य कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोनाने आता जिल्ह्यातून पूर्णपणे काढता पाय घेण्यास ...
गोंदिया : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शून्य कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोनाने आता जिल्ह्यातून पूर्णपणे काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे दिलासादायक चित्र आहे. याच महिन्यात पाच दिवस एकाही कोरोना बाधितांची नोंद झाली नसून हीच स्थिती राहिल्यास विदर्भात सर्वात आधी कोरोनामुक्त होणारा जिल्हा म्हणून गोंदियाचे नाव टॉपवर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी (दि.१७) एकूण ९०० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८३४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ६६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील शून्यच होता. शनिवारी एका बाधितांने कोरोनावर मार केल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५ वर आली आहे. तिरोडा तालुका कोरोनामुक्त असून इतर सात तालुक्यात सुध्दा दोन-तीन कोरोना ॲक्टिव रुग्ण आहे. कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला असून लवकरच जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसर्ग आटोक्यात आला असला तरी नागरिकांना पूर्वी इतकीच खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास जिल्ह्यातून कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यास मदत होईल. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत २१०४५५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८४९७१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात असून यांतर्गत २२०६५० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९९५६६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११७० कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०४५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ३९२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.................
डेल्टा, झिकाच्या अनुषंगाने खबरदारी बाळगा !
जिल्ह्यात डेल्टा, डेल्टा प्लस व झिका आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र आजाराचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये यासाठी खबरदारी बाळगण्याची गरज आहे. आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेण्याची गरज आहे. तरच या आजाराचा जिल्ह्यात शिरकाव होण्यापासून बचाव होऊ शकतो.