दिलासा...रेमडेसिविरसह कोरोनावरील औषधांचा साठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:33+5:302021-04-26T04:26:33+5:30
गोंदिया : जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनसह कोरोनावरील औषधांच्या मागणीत वाढ झाली होती. दरम्यान एकाचवेळी ...
गोंदिया : जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनसह कोरोनावरील औषधांच्या मागणीत वाढ झाली होती. दरम्यान एकाचवेळी मागणी वाढली. मात्र त्या तुलनेत पुरवठा न झाल्याने काही औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र शनिवारी जिल्ह्यात रेमडेसिविरसह कोरोनावरील इतर औषधांचा देखील साठा उपलब्ध झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनावरील फॅबिफ्लू, हायड्रोक्लोविन, क्लोरोक्विन, ॲझथ्रोमॅसीन, ओझेला थिमरसह काही औषधांचा पुरवठा गोंदिया जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना विलंबाने झाला होता. त्यामुळे काही औषधांचा तुटवडा दोन-तीन दिवस तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसाेय झाली होती. मात्र शनिवारी या सर्व औषधांचा स्टॉक उपलब्ध झाल्याने आता कोरोनावरील औषधे सर्वच औषध वितरकांकडे उपलब्ध झाला आहे. औषधांचा पुरेशा प्रमाणात स्टॉक असल्याने आता रुग्णांची गैरसोय टाळण्याससुध्दा मदत झाली आहे. विशेष म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी लक्षात घेता आता त्याचासुध्दा साठा वाढवून देण्यात आला आहे. १.४९ टक्के एवढ्या प्रमाणात आता जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे. या इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून केले जात आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत कोरोनाशी निगडित औषधांचा तुटवडा नसून पुरेशा प्रमाणात सर्व वितरक आणि विक्रेत्यांकडे स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, अशी प्रभारी औषध निरीक्षक संदीप नरवने यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
.......
२३ दिवसात चार हजारांवर रेमडेसिविरची विक्री
कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी आणि आवश्यक नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र यानंतरही रेमडेसिविरची मोठी मागणी होत असल्याचे चित्र आहे. गोंदिया १ ते २३ एप्रिल या कालावधीत तब्बल ४१०२ रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री झाली आहे.