जिल्ह्यात न्यूमोकोकल लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:47+5:302021-07-12T04:18:47+5:30
गोंदिया : जिल्हा आदिवासीबहुल असून दुर्गम भागात बालमृत्यूचे प्रमाण सर्वधिक आहे. बालमृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे न्यूमोनिया असून केंद्र ...
गोंदिया : जिल्हा आदिवासीबहुल असून दुर्गम भागात बालमृत्यूचे प्रमाण सर्वधिक आहे. बालमृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे न्यूमोनिया असून केंद्र सरकारने न्यूमोनिया प्रतिबंधक लस आता नवजात शिशूंसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ सोमवारी (दि.५) येथील बाई गंगाबाई रुग्णालयात रुग्णालयात ६ आठवड्यांच्या बाळाला लस देऊन करण्यात आला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत न्यूमोनिया असणाऱ्या बालकांचादेखील बळी गेला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १ वर्षाच्या आतील पात्र बालकांचे न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरण जलद गतीने केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा टास्क फोर्समार्फत जय्यत तयारी केली जात आहे. यासाठी बुधवारी (दि.७) सर्व वैद्यकीय अधिकारी व लस टोचकांचे प्रशिक्षण युनिसेफचे समन्वयक डॉ. साजिद व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर व डॉ. चांदेवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ही न्यूमोनिया प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात आला आहे. तसेच ब्लॉक लेव्हलवरसुद्धा टास्क फोर्समार्फत लसीकरण कार्यक्रमबाबत मोहीम राबविण्यात येत असून लसीकरणासाठी जिल्हा सज्ज आहे, अशी माहिती डॉ. हुबेकर यांनी दिली आहे.