मनरेगांतर्गत सेजगाव, सावरा येथे कामाला सुरुवात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:42 AM2021-02-26T04:42:11+5:302021-02-26T04:42:11+5:30
शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांकरिता भिंतीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील ...
शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांकरिता भिंतीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, सण, उत्सव व गणिताचाही समावेश करण्यात येतो. विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकता यावे, हा यामागील उद्देश आहे. आधुनिकतेच्या युगात आता ई-लर्निंग सुरू केले असून, संगणकाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणात अभिरुची निर्माण केली जाते; परंतु भौतिक सुविधांअभावी कित्येक शाळेच्या इमारती मोडकळीस आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये अडथळा निर्माण होता. तो दूर करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शालेय व अंगणवाडी परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना, शोषखड्डा तयार करणे, शौचालय बांधकाम करणे, खेळाचे मैदान तयार करणे, संरक्षक भिंत, आवश्यकतेनुसार पेविंग ब्लॉक लावणे, बोअरवेल बांधकाम करणे आदी कामांची सुरुवात करण्यात आली. जि.प.शाळा सेजगाव येथे खेळाचे मैदान सपाटीकरण करणे व जि.प.शाळा सावरा येथे संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. भाजप जिल्हा महामंत्री मदन पटले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, कृउबास संचालक चत्रभूज बिसेन, गटशिक्षणाधिकारी मधु पारधी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी प्रकाश गंगापारी, सेजगावचे सरपंच कंठीलाल पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन, सावराचे सरपंच वंदना राणे, उपसरपंच गिरधारी बानेवार, माजी जि.प.सदस्य कैलास पटले, युवा मोर्चा अध्यक्ष गौरी पारधी उपस्थित होते.