वस्तूस्थिती जाणूनच टिपणी करा
By Admin | Published: July 1, 2016 01:50 AM2016-07-01T01:50:40+5:302016-07-01T01:50:40+5:30
शासकीय मेडीकल कॉलेजची संकल्पना आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सन २००९ मधील निवडणूक घोषणापत्रात केली होती.
पृथ्वीपालसिंह गुलाटी : टीका करणाऱ्यांना लगावला टोला
गोंदिया : शासकीय मेडीकल कॉलेजची संकल्पना आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सन २००९ मधील निवडणूक घोषणापत्रात केली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक जिंकताच त्यासाठी प्रयत्न सुरू केले. मेडीकल कॉलेजसाठी प्रयत्न सुरू असताना पुढे न येता आता मात्र भारतीय जनता पक्षातील एक नेता टिकाटिपणी करीत आहे. मात्र त्यांनी वस्तूस्थिती जाणून टिपनी करायला हवी असा टोला कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी यांनी पत्रकातून लगावला आहे.
पत्रकानुसार, डिसेंबर २०१२ मध्ये नागपूर सत्रात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोंदिया शासकीय मेडीकल कॉलेजला मंजूरी दिली होती. तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहनसिंह यांनी कॉलेजसाठी १४२ कोटींचा निधी, कुडवा येथील जागेचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मार्च २०१४ मध्ये घेतला होता. तर मुख्यमंत्री चव्हाण यांनी जागा, डीन डॉ. केवलिया यांची नियुक्ती, ५१० पदांची निर्मिती इत्याही कारवाई केली होती. त्यानंतर आता प्रफुल अग्रवाल यांच्या जनहित याचिकेमुळे कॉलेजला मंजूरी मिळाली.
कॉलेज मंजूरीचे श्रेय आमदार अग्रवाल यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री प्रफुल पटेल, पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले यांना दिले आहे. असे असतानाही भाजपातील एक नेता ते फक्त एकटेच श्रेय लाटत असल्याची टिपनी पत्रक वाटून करीत आहे. यासाठी त्यांनी वस्तूस्थिती जाणून घ्यावी असा सल्ला देत टोला गुलाटी यांनी लगावला आहे. (शहर प्रतिनिधी)