घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर
By admin | Published: February 17, 2017 01:52 AM2017-02-17T01:52:46+5:302017-02-17T01:52:46+5:30
येथे गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती गॅस धारकांना गॅस मिळणे कठीण झाले आहे.
सौंदड : येथे गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती गॅस धारकांना गॅस मिळणे कठीण झाले आहे. शासन नियमाने एक गॅस धारकाला वर्षापोटी १२ सिलेंडर देणे बंधनकारक आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही गॅस सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून अनेक सिलेंडर धारकांना अद्याप आॅनलाईन बुकींग करूनही गॅस मिळणे कठीण झाले आहे.
विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्हा वेगळे झाले. मात्र सडक-अर्जुनी तालुक्यात अजूनही कुठल्याही कंपनीची गॅस एजंसी नसल्याने संबंधीत ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यामध्ये अनेक गॅस एजंसी आहेत व जिल्ह्याबाहेरील अनेक एजंसी धारक तालुक्यामध्ये गॅस एजसी चालवत आहेत. परंतु राशनधारक ग्राहकाला वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने राशन धारकांना स्वयंपाकाकरीता लाकडांचा आसरा घ्यावा लागत आहे. शासनाने नुकतीच उज्वल गॅस योजना सुरु केली आहे. परंतु जुन्याच राशन धारकाना गॅस मिळत नसल्याने या योजनेचा फज्जाच उडाल्यासारखे होय.
परिसरातील अनेक धाबे, हॉटेल्स, चहाटपऱ्या, नास्ता, गॅस वेल्डींग, कॅटरर्स, वाहन व अनेक व्यवसायीकांच्या भट्टीवर घरगुती वापराचे गॅस सिलेंडर सर्रासपणे दिसून येते. मात्र व्यवसायीकांना एलपीजी गॅस सिलेंडर कसे व कुठून उपलब्ध होतात ही बाब गुलदस्त्यात आहे.संबधीत गॅस धारक किंवा डिलेवरी बॉय शासन नियमाला न जुमानत व काळ्या बाजारातून उपलब्ध करून देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
आॅनलाईन बुकींग करूनही नागरिकांना दोन-दोन महिन गॅस मिळत नाही. परंतु ब्लॅकमध्ये केव्हा व कधीही कुठल्याही कंपनीचा गॅस त्वरीत उपलब्ध करून देण्याकरीता अवैध व्यवसायीक तत्पर असल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे संबंधीत अधिकाऱ्यांचा कानाडोळा आहे. तसेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मात्र पाणी कुठे मुरते हे त्याचे त्यांनाच माहिती. मात्र सामान्य गॅस धारक त्रस्त होतांना दिसून येतो. अनेकदा सिलेंडर संपल्यास दुसरा सिलेंडर सणासुदीच्या काळात मिळविणे कठीण जाते. अनेकदा पायपीट करूनही ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होत नाही.
ग्राहकांना सिलेंडरचा सुरळीत व नियमित पुरवठा न होण्यामागे जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करीत आहेत. संबंधीत विभागाने याची दखल घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)