समितीने धरले अधिकाऱ्यांना धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:25 PM2018-01-18T22:25:55+5:302018-01-18T22:26:14+5:30

विधानमंडळांची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरूवारी (दि.१८) जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन आदिवासींकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

The committee has arrested the officials | समितीने धरले अधिकाऱ्यांना धारेवर

समितीने धरले अधिकाऱ्यांना धारेवर

Next
ठळक मुद्देअनुसूचित जमाती कल्याण समिती : दोन दिवस जिल्ह्यात मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानमंडळांची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरूवारी (दि.१८) जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन आदिवासींकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जवळपास चार तास समितीच्या सदस्यांनी बंदद्वार आढावा घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची विश्वसनीय माहिती आहे.
विधानमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरूवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी अर्लट झाले होते. विदर्भ एक्सप्रेसने येणारे कर्मचारी सुध्दा इंटरसिटीने सकाळीच कार्यालयात पोहचले होते. समितीने कोणत्या कार्यालयाला आकस्मिक भेट दिल्यास कारवाई होवू शकते. या भीतीने बहुतेक सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित होते. विशेष म्हणजे ही समिती देखील विदर्भ एक्सप्रेसने गुरूवारी सकाळी ११.३० वाजता गोंदिया दाखल झाली. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये एकूण १५ सदस्यांचा समावेश आहे. मात्र या समितीतील चार सदस्य गुरूवारी आले नव्हते.
समिती सदस्यांमध्ये आ. संजय पुराम, प्रभुदास भिलावेकर, पास्कल धनारे, अमित घोडा, राजाभाऊ वाजे, शांताराम मोरे, डॉ. संतोष टारफे, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, आनंद ठाकुर, चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश होता.
समितीच्या सदस्यांनी विश्रामगृहात विश्रांती घेतल्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बंदव्दार आढावा बैठक घेतली.
समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिल्ह्यात आदिवासी बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यांची अंमलबजावणी आणि त्यांच्या विकासासाठी कुठली विशेष कामे केली याची माहिती घेतली. तसेच जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांच्या मुद्दावरुन संबंधित विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरल्याची माहिती आहे. आदिवासी व दुर्गम भागात राबविण्यात आलेल्या काही कामांवर या समितीने आक्षेप घेतल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी करणार जिल्ह्याचा दौरा
जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी विकासाच्या योजनांची पाहणी शुक्रवारी (दि.१९) ही समिती करणार आहे. काही आक्षेपहार्य कामांची यादी या समितीने तयार केली असून या कामांची पाहणी समिती करणार असल्याची माहिती आहे.
विविध संघटनांनी दिले निवेदन
येथील विश्रामगृहात विविध आदिवासी समाज संघटनानी अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांची भेट घेतली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले. शनिवारी ही समिती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहे.

Web Title: The committee has arrested the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.