समितीने केली शहर स्वच्छतेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:08 PM2018-01-11T22:08:38+5:302018-01-11T22:08:49+5:30
स्वच्छ भारत मिशन-२०१८ अंतर्गत राज्यस्तरीय चमूने नगर परिषदेने शहरात स्वच्छता विषयक केलेल्या कामांची पाहणी केली. बुधवार आणि गुरूवारी समितीने शहरातील विविध भागाना भेट देऊन कामांची माहिती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ भारत मिशन-२०१८ अंतर्गत राज्यस्तरीय चमूने नगर परिषदेने शहरात स्वच्छता विषयक केलेल्या कामांची पाहणी केली. बुधवार आणि गुरूवारी समितीने शहरातील विविध भागाना भेट देऊन कामांची माहिती घेतली. सार्वजनिक व खाजगी शौचालय आणि स्वच्छतेची पाहणी करुन शहरवासीयांसोबत संवाद साधला.
हागणदारीमुक्त अभियानांतर्गत सरकारडून शौचालय बांधकामावर जोर दिला जात आहे. यासाठी सार्वजनिक व खाजगी शौचालयांच्या बांधकामासाठी सरकार पुरेपूर सहकार्य करीत आहे. शिवाय शहर स्वच्छ असावे यासाठी स्वच्छ भारत मिशन हा विशेष कार्यक्रम राबविला जात आहे. यांतर्गत शहरांना स्वच्छतेसाठी रॅकींग दिले जात आहे. स्वच्छ भारत मिशन-२०१८ सुरू झाले असून ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधतीत केंद्रीय समितीकडून स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्रीय समितीकडून होणाºया स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत नगर परिषदेने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समितीकडून ९ व १० जानेवारी स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. या राज्यस्तरीय समितीतील रूचा ठवकर व अमृता परांजपे यांनी मंगळवारी (दि.९) गोंदिया नगर परिषदेला भेट दिली. पहिल्या दिवशी त्यांनी स्वच्छता विषयक कामकाजाचा आढावा घेतला. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.१०) शहरातील छोटा गोंदिया, मरारटोली, सुर्याटोला, कुंभारेनगर परिसरातील सार्वजनिक व खाजगी शौचालयांची पाहणी केली. या पाहणी त्यांनी नागरिक उघड्यावर शौचास जातात का याची पाहणी केली. तसेच परिसरातील लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडून नगर परिषदेतंर्गत राबविल्या जाणाºया कामांचा आढावा घेतला.
समितीने दिल्या सूचना
या सर्वेक्षणात समितीने शौचालयांच्या मलनिसारण व्यवस्थेची पाहणी केली. सेव्हरेज ट्रिटमेंट प्लांट तयार करणे, सार्वजनिक शौचालयांभोवती सौंदर्यीकरण करणे, शौचालयासाठी वापर केल्या जात असलेल्या नगर परिषदेच्या खुल्या जागांवर वृक्षारोपण, विद्युतीकरण, खुर्च्या लावून बसण्याची व्यवस्था करून सौंदर्यीकरण करणे, शौचालयांचा वापर व स्वच्छता याबाबत शहरवासीयांत जागृती करणे याबाबत सूचना दिल्या.