कार्यालयातून तक्रार पेट्या गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:48+5:302021-08-02T04:10:48+5:30
मोबाईल नेटवर्क कुचकामी पांढरी : कोसमातोंडी परिसरातही सर्वच कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून नेटवर्क ...
मोबाईल नेटवर्क कुचकामी
पांढरी : कोसमातोंडी परिसरातही सर्वच कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून नेटवर्क काम करीत नसल्याने मोबाईल ग्राहक त्रस्त बनले आहेत. यामुळे अनेक कामे सुध्दा खोळंबली आहेत. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी परिसरातील मोबाईल ग्राहकांनी केली आहे.
वीज जोडणीसाठी जीवन प्रकाशयोजना
बिरसी फाटा : राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने घरगुती वीज जोडणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता लाभार्थ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून लाभ घ्यावा, असे कळविले आहे.
कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
सडक-अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी अडचण होते.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.
रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत
अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडुपांमुळे वाहन दिसत नाही. झुडपे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
वाहतूक कोंडीवर उपाययोजनेची मागणी
बिरसी फाटा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कायम कोंडी असते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने शहरातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग पार करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यासाठी वाहनधारकच जबाबदार असल्याचे बोलले जाते.
शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील अनेक शेत शिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वन कायद्यामुळे हात बांधलेले आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कोरोनाच्या धास्तीने बैल बाजार ओस
गोरेगाव : एकेकाळी प्रसिद्ध असलेला जिल्ह्यातील बैल बाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी खरेदीदारच मिळत नसल्याने हे बाजार ओस पडले.
बेरोजगारीमुळे युवा पिढीत नैराश्य
गोरेगाव : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले हजारो तरुण, तरुणी नोकरीच्या शोधार्थ आहेत. कोरोनाने सर्व उद्योगधंदे थांबले असल्याने नोकरी शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावा.
रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर, मालकांवर कारवाई करा
तिरोडा : शहरातील प्रमुख रस्त्यांवर जनावरांचा वावर राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. नगरपरिषदेने याची दखल घेऊन मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी तिरोडावासीयांनी केली आहे.