बांधकामाची ती तक्रार निरर्थक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:55+5:302021-05-31T04:21:55+5:30
गोंदिया : शहरातील शिवनगर ते रिंगरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, तक्रार करून या पुलाचे बांधकाम थांबविण्याचा ...
गोंदिया : शहरातील शिवनगर ते रिंगरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, तक्रार करून या पुलाचे बांधकाम थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती तक्रार बिनबुडाची असून पुलाचे बांधकाम थांबवू नये, अशी मागणी शिवनगरवासीयांनी केली आहे. याबाबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिवनगर ते रिंगरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शिवनगरवासीयांनी १५ नोव्हेंबर २०१७ रोजी नगराध्यक्ष, तत्कालीन खासदार नाना पटोले, तत्कालीन राज्यमंत्री परिणय फुके यांच्याकडे निवेदनातून केली होती. दरम्यान, पुलाच्या बांधकामास मंजूर मिळाली व बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, पुलाचे बांधकाम थांबविण्यात यावे, ते फक्त ले-आऊटधारकांच्याच फायद्याचे काम आहे, अशी तक्रार करून हे बांधकाम थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या पुलाच्या बांधकामामुळे शिवनगरातील १००-१२५ घरांतील लोकांना लाभ होणार आहे. येथील नागरिकांना लांब अंतर कापून रिंगरोडवर जावे लागते व फेऱ्याचे अंतर जवळजवळ एक किलोमीटर कमी होणार आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम थांबवू नये, अशी मागणी शिवनगरवासीयांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना व्ही. एस. जांभूळकर, आर. आर. नागवंशी, आर. एन. लांजेवार, एच. ए. मानकर, आर. एन. फरकुंडे, एस. एच. गोखे, रमेश टेंभरे, प्रीती टेंभरे, संगीता शिवणकर, डॉ. टेंभरे, खेमेंद्र कटरे, एस. एच. तुरकर आदी उपस्थित होते.