जलयुक्त शिवारची १७६४ कामे पूर्ण
By admin | Published: October 7, 2016 01:53 AM2016-10-07T01:53:17+5:302016-10-07T01:53:17+5:30
सिंचनाचे संरक्षित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात अनेक कामे करण्यात आली.
सिंचन क्षेत्र वाढले : विहिरींच्या पाणीपातळीत एक फुटापर्यंत वाढ
गोंदिया : सिंचनाचे संरक्षित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात अनेक कामे करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात १९६४२.३० हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे. शिवाय विहिरीतील पाण्याच्या पातळीतही सरासरी अर्धा ते एक फुटापर्यंत वाढ झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे निर्माण झालेल्या पाणीसाठ्याची क्षमता १९४५४.१९ टीसीएम आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १४४२ मिमी असून यावर्षी आतापर्यंत सरासरी झालेला पाऊस १०२९ मिमी एवढा आहे. पाणीसाठ्याची क्षमता वाढल्याने रबी व उन्हाळी पिकांना याचा लाभ मिळू शकेल.
जलयुक्त शिवाय अभियानांतर्गत गाळ काढणे, खोलीकरण, रूंदीकरण करणे आदी कामांसाठी एकूण ९४ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी ५२ गावांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू करण्यात आली.
शासनाच्या माध्यमातून २२७ व लोकसहभागातून ९९ अशी एकूण ३२६ कामे करण्यात आली. यात ५०३९२१.८१ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. तर गाळ काढलेल्या खोलीकरण/रूंदीकरण केलेल्या कामांची लांबी ७५.८१ किमी आहे.
सन २०१५-१६ मध्ये पूर्ण झालेली कामे
सलग समतल चर (हेक्टर) ४, माती नालाबांध २४, मजगी (हेक्टर) २९, गॅबियन स्ट्रक्चर ६४, खोल सलग समतल चर (हेक्टर) ९, शेततळे १३१, साखळी सिमेंट बंधारा १३०, सिमेंट बंधारा दुरूस्ती २२, नाला खोलीकरण-नाला सरळीकरण १२४, केटी वेअर १४ , गाळ काढणे शासकीय ११३, गाळ काढणे सीएसआर ९९, ठिंबक सिंचन (हेक्टर) २३९, तुषार सिंचन (हेक्टर) ८, वन तलाव ४४, भार खाचर दुरूस्ती (हेक्टर) ४२०, साठवण बंधारा २९, बोडी खोलीकरण-जुनी बोडी दुरूस्ती १५८, तलाव खोलीकरण-तलाव दुरूस्ती ६८, मामा तलाव दुरूस्ती २१, लघू पाटबंधारे तलाव दुरूस्ती ८, कालवे दुरूस्ती ३, इतर ३ अशी एकूण एक हजार ७६४ कामे पूर्ण झालेली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे.