जलयुक्त शिवारची १९२ कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:30 PM2019-04-10T22:30:27+5:302019-04-10T22:30:49+5:30
राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाच्या माध्यमातून पाण्याची पातळी कशी वाढविता येईल, यावर विशेष भर दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाच्या माध्यमातून पाण्याची पातळी कशी वाढविता येईल, यावर विशेष भर दिला आहे.
जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने लघु पाटबंधारे विभाग जि.प., वनविभाग, जलसंधारण व पंचायत समिती अशा विविध यंत्रणेच्या माध्यमातून कामे केली जातात. जि.प.अंतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यात २७५ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यानुरुप २१६ कामे सुरु करण्यात आली असून १९२ कामे पूर्ण झाली आहेत. तर २४ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानात यापूर्वी जिल्ह्यातील २३४ गावांचा समावेश करण्यात आला.त्यानुरुप सन २०१८-१९ या वर्षात १६५ गावात जलयुक्त शिवारची कामे घेण्यात आली.
यामध्ये जी गावे जलयुक्त शिवारमध्ये समावेशित करण्यात आली होती. त्या गावात जलसंधारणची कामे घेण्यात आली. यामध्ये पहिल्या वर्षी ९४ गावे दुसऱ्या वर्षी ७७ त्यानंतर ६३ गावे व सन २०१८-१९ मध्ये १६५ गावे समाविष्ट करण्यात आली होती. अभियानाच्या माध्यमातून जी कामे करण्यात आली. त्यानुरुप जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात जि.प.अंतर्गत २७५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातंर्गत २१६ कामे सुरु करण्यात आली तर १९२ कामे पूर्ण झालीत.
यामध्ये आमगाव तालुक्यात ४३ कामे सुरु करण्यात आली, यापैकी ४१ कामे पूर्ण झाली आहेत. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात २ पैकी १, देवरी तालुक्यात १० पैकी ४, गोंदिया तालुक्यात ७७ पैकी ६९, गोरेगाव तालुक्यात ४३ पैकी ३९, सडक अर्जुनी तालुक्यात ८ पैकी ६, सालेकसा तालुक्यात २० पैकी २० तर तिरोडा तालुक्यात १३ पैकी १२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर ५ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर २४ कामे प्रगतीपथावर असून ही कामे देखील लवकरच पूर्ण होणार आहेत. एकूणच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत जी कामे करण्यात आली. यामध्ये भातखाचरची १३३ कामे, तलावाची ४० कामे तर नाल्या सरळीकरणाची १९ असे एकूण १९२ कामे पूर्ण झाली आहेत.