महसूल वसूली वेळेत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:10 PM2017-11-27T23:10:09+5:302017-11-27T23:10:33+5:30
विविध यंत्रणांना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येतो.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : विविध यंत्रणांना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येतो. महसूल विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. यंत्रणांनी व महसूल विभागाने आपली कामे नियोजनातून निर्धारित वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी (दि.२५) विविध यंत्रणा व महसूल विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपायुक्त सुधाकर तेलंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी.मुंडे उपस्थित होते.
अनुप कुमार पुढे म्हणाले, यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. भविष्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन आतापासूनच करावे. भूजल संरक्षण अधिनियम कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही सुचविले.
जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा असे सांगितले. धापेवाडा टप्पा-२, झाशीनगर उपसा सिंचन योजना, निमगाव प्रकल्प, पिंडकेपार-डांगुर्ली प्रकल्प, मानागड प्रकल्प या प्रकल्पांच्या पुर्णत्वाला गती मिळाली पाहिजे. बिरसी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावे, जिल्हा परिषदेतील वर्ग-२ ची रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक कुटूंबातील व्यक्ती शौचालयाचा नियमीत वापर करतील यासाठी प्रवृत्त करावे, बँकेशी समन्वय साधून सहकार विभागाने पीक कर्ज योजनेचे पैसे पात्र शेतकºयांच्या खात्यात उपलब्ध होताच जमा करावे, असे सांगीतले.
धडक सिंचन विहिर कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकºयांना संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार असल्याचे सांगत त्यांनी जिल्ह्यातील शेतकºयांना इतर पिके घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे, असे सांगीतले. याप्रसंगी रविंद्र ठाकरे म्हणाले, डिसेंबर अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणाºया गावांचे नियोजन करण्यात आले असून रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येणार नाही. अवैध रेती उत्खनन होणार नाही याकडे लक्ष द्यावे, महसूली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
डॉ.भूजबळ यांनी, नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता विषद केली. पोलीस गृह निर्माण योजनेंतर्गत पोलिसांच्या शासकीय निवासस्थाने व पोलीस ठाण्याच्या इमारतबाबतची माहिती दिली.
दिरंगाई करणाºयांची गय नाही
याप्रसंगी अनुप कुमार यांनी रोहयोच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे उपलब्ध झाल्यास मजुरांच्या हाताला काम मिळेल. त्या माध्यमातून विकास कामे करताना जिल्हा राज्यात अव्वल कसा राहील याचे नियोजन करावे, यासाठी टिमवर्कम्हणून काम करावे. या कामात दिरंगाई करणाºयांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
रस्ते दुरूस्ती व पर्यटनस्थळांवर भर
याप्रसंगी अनुप कुमार यांनी, जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, रेतीघाटांमुळे ज्या गावांचे रस्ते खराब झाले आहे त्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी खनिज विकास प्रतिष्ठाणमधून निधी उपलब्ध करु न द्यावा, जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे, निसर्ग संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने देखील संवर्धन झाले पाहिजे असे म्हणाले.