डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण लसीकरण अशक्यच, लसीकरणासाठी लागणार पुन्हा दीड वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:22 AM2021-05-31T04:22:01+5:302021-05-31T04:22:01+5:30

गोंदिया : कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हेच प्रमुख शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर ...

Complete vaccination is impossible by the end of December, it will take another year and a half for vaccination | डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण लसीकरण अशक्यच, लसीकरणासाठी लागणार पुन्हा दीड वर्ष

डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण लसीकरण अशक्यच, लसीकरणासाठी लागणार पुन्हा दीड वर्ष

Next

गोंदिया : कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हेच प्रमुख शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर केंद्रित आहे. लसीकरणाला नागरिकांचा व्यापक प्रतिसाद मिळावा यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५६ हजार ४५६ असून, यात १८ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण हे १० लाखांवर आहे. म्हणजेच १० लाख नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ४६ हजार ८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. म्हणजेच एकूण २५ टक्के लसीकरण झाले आहे. अद्यापही ७ लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरण होणे शक्य आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबरपर्यंत ५ लाख नागरिकांचे लसीकरण होण्याची शक्यता असून, संपूर्ण लसीकरणासाठी पुन्हा दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, तर आज, सोमवारपासून जिल्ह्यातील एकूण १४० केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाला लसींचा साठासुद्धा प्राप्त झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात दररोज ५ ते ६ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, मध्यल्या काळात लसीकरणाची गती लसींचा पुरवठा न झाल्याने मंदावली होती. मात्र, आता जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवरून लसीकरण सुरळीतपणे सुरू आहे.

...............

आधी केवळ ४५ केंद्रे, आता १४०

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट लवकर पूर्ण व्हावे यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. पूर्वी जिल्ह्यात केवळ ४५ केंद्रे होते. मात्र, लसीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी १४० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवरून दररोज पाच ते सहा हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

...............

कोट

जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने सध्या लसीकरणाचे टार्गेट पुढे ठेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. आतापर्यंत अडीच लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण केंद्राची संख्या वाढवून लसीकरणाला गती देण्यात येईल. तसेच नागरिकांनी सुद्धा लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे.

दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी.

......................

१८ वर्षांपेक्षा कमी वयाचे काय?

- लसीकरणासाठी शासनाकडून होणारा लसींचा पुरवठा लक्षात घेता ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसींचा पुरवठ्यात वाढ झाल्यानंतर १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

- कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मात्र, १८ वर्षांखालील बालकांना लसीकरण करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.

- १८ वर्षांखालील बालकांना लसीकरण करण्यासाठी सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही.

- जिल्ह्यात १८ वर्षांखालील बालकांची संख्या अडीच लाखांवर आहे. शाळांचे शैक्षणिक सत्र लक्षात घेता त्यांचेसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची गरज आहे.

..................

१६ जानेवारीपासून सुरुवात झाली लसीकरणाला

जानेवारी

प्रत्येक दिवशी- २३००

प्रत्येक आठवड्यात- १८४००

प्रत्येक महिन्यात : ४५८८७

...................

फेब्रुवारी

प्रत्येक दिवशी- ४३००

प्रत्येक आठवड्यात- ३०१००

प्रत्येक महिन्यात : ६५४३८

.......

मार्च

प्रत्येक दिवशी- ५५४३

प्रत्येक आठवड्यात- ४५३२६

प्रत्येक महिन्यात : ५४३२९

........

एप्रिल

प्रत्येक दिवशी- ३४५३

प्रत्येक आठवड्यात- २६५४९

प्रत्येक महिन्यात : ५५३२४

...............

मे

प्रत्येक दिवशी- ३३००

प्रत्येक आठवड्यात- २६५४३

प्रत्येक महिन्यात : ५३२५४

.........................

Web Title: Complete vaccination is impossible by the end of December, it will take another year and a half for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.