६० दिवसांत ६.१६ कोटींचे काम पूर्ण
By admin | Published: June 24, 2017 01:46 AM2017-06-24T01:46:58+5:302017-06-24T01:46:58+5:30
सन २०१७-१८ मध्ये तिरोडा मग्रारोहयो अंतर्गत दररोज ११ हजार ५०० मजुरांना दोनशेच्या वर कामांमध्ये सामावून घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : सन २०१७-१८ मध्ये तिरोडा मग्रारोहयो अंतर्गत दररोज ११ हजार ५०० मजुरांना दोनशेच्या वर कामांमध्ये सामावून घेण्यात आले. ६० दिवसांत म्हणजे १५ जूनपर्यंत सहा कोटी १६ लाख रूपये खर्च करण्यात आले. संपूर्ण कामे सुरळीत पार पडली तरी कामावर तीन वर्षांत तीन मजुरांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांना लाभ देण्यात आला तर एका कुटुंबाने मृत्यू दावा घेण्यास नकार दिला.
तिरोडा तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत कालवा दुरूस्ती, नाला सरळीकरण, पांदण रस्ता, तलाव खोलीकरण, शौचालय, घरकूल, गुरांचे गोठे बांधकाम व विहीर बांधकाम अशी अनेक कामे आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१७ ते १५ जून २०१७ पर्यंत करण्यात आले. यात प्रत्येक दिवसाला सरासरी ११ हजार ५०० मजुरांना कामाचा लाभ घेता आला. आठवडी बाजाराकरिता एक दिवसाची सुट्टी वगळता महिन्यात २४ दिवस मजुरांना काम देण्यात आले.
एप्रिल महिन्यात एकूण २१४ काम सुरू होते. या कामावर दरदिवसी नऊ हजार ७९५ मजुरांनी काम केलेले आहे. मे २०१७ मध्ये १६९ कामे सुरू होते. यावर दर दिवसाला ११ हजार ९७७ मजुरांना काम देण्यात आले. तर जून २०१७ मध्ये १५७ कामे सुरू होते. यात दरदिवसी १० हजार ते सर्वाधिक १३ हजार ५७७ मजुरांनी काम केले आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तिरोडा तालुक्यात मग्रारोहयोंतर्गत जिल्ह्यातून सर्वाधिक कामे झाल्याची माहिती आहे.
आजपर्यंत खर्च करण्यात आलेल्या कामाच्या निधीनुसार सर्वच कामे पूर्ण झाले का, याबाबत चौकशी केली असता काही कामे अपूर्ण असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली. तसेच मजुरांना वेतन देण्यास निधी कमी पडला नसल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु कुशल साहित्याचा निधी डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत उपलब्ध झाला नसल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र आता सर्व सुरळीत झाल्याचे सहायक कार्यक्रम अधिकारी एल.डी. चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.
किती मजुरांना ९० दिवस काम मिळाले, या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण यांनी सांगितले की, दिवसांची परिगणना १ एप्रिल ते ३१ मार्च या दरम्यान केली जाते. सन २०१६-१७ मध्ये तीन हजार ५०० मजुरांना ९० दिवस काम मिळाले होते. रोजगार सेवकांनी ९० दिवसांचे काम पूर्ण करणाऱ्यांची यादी तयार करून कामगार कल्याण आयुक्तालयात नोंदणी केली जाते.
ज्यांनी नोंदणी केली त्यांना शासनाकडून घोषित योजनांचा लाभ दिला जातो, असेही कार्यक्रम अधिकारी एल.डी. चव्हाण यांनी सांगितले.
मृत महिलेच्या कुटुंबाने लाभ नाकारला
तिरोडा तालुक्यात मग्रारोहयोंतर्गत सुरू असलेल्या कामावर तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात बिहिरीया येथील लखन भदू शहारे यांचा मृत्यू झाला होता. त्यांना शासनातर्फे ५० हजार रूपयांची मदत देण्यात आली होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षात सीतेपार येथील बलीराम नागो रोकडे यांचा मृत्यू १९ मे २०१६ रोजी कामावर असताना झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा मृत्यू लाभाची रक्कम देण्यात आली होती. तर यावर्षी २०१७-१८ मध्ये करटी येथील तरासन विठोबा पटले (५५) या महिलेचा ३० मे २०१७ रोजी दुपारी ३.३० वाजता कामावर असताना प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी नकार दिल्याने त्या कुटुंबाला आर्थिक दावा देण्यात आला नाही. सदर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तसे लेखी लिहून दिले आहे.