पावसाअभावी धान उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:08 AM2018-08-08T01:08:26+5:302018-08-08T01:12:13+5:30
मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मागील वीस दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस झाला नाही. परिणामी धानाच्या बांध्यामध्ये भेगा पडल्या आहेत. काही शेतकºयांची पावसाअभावी रोवणी खोळंबली आहेत. मागील वर्षी सुध्दा दुष्काळ पडला होता. त्यानंतर यावर्षीही तशीच स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी रोवणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने धान पिक धोक्यात आले आहे. तिरोडा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. मात्र पावसाअभावी शेतात भेगा पडल्या असून धान वाळत चालल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांना धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळते, त्यांच्यावर सुध्दा संकट ओढावले आहे. शेतातील धान पिक पिवळे पडत आहे. परिसरातील ८० ते ८५ टक्के रोवणी झालेली असून १५ ते २० टक्के रोवणी शिल्लक आहेत. ढगाळ वातावरणामुळे धान पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव सुध्दा वाढण्याची शक्यता आहे. विजेचा पुरवठा अनियमित होत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. यावर्षी हवामान विभागाने चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत.