रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईकांचे बेहाल! सर्वत्र संताप (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:28+5:302021-04-13T04:27:28+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांचेही हाल होत आहेत. बाहेर त्यांना कुणीच मदत करायला तयार नाही. ‘दूर रहा, दूर रहा’ फक्त एवढेच ऐकायला येत आहे. रुग्णांसोबत आलेल्या इतर नातेवाईकांची जेवणाची सोय नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. चहा, पाणी व नाश्ता मिळणे कठीण आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले जाते. त्यांचे हाल तर होतच आहेत. सोबत याच रुग्णालयाच्या दुसऱ्या वॉर्डात इतर आजारांचे रुग्ण असल्याने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांना वॉर्डाच्या बाहेर रहावे लागत आहे. यामुळे रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांचा डोळ्याला-डोळा रात्रभर लागत नाही नसून रात्र जागून काढावी लागत आहे. सोबतच त्यांना खाण्या-पिण्यासाठी खिशात पैसे असले तरी ते खर्च करायला बाहेर एकही दुकान नाही. कोरोनामुळे जो-तो वैरी होऊन बसल्याचे चित्र रुग्णालय परिसरात दिसून येत आहे.
.....
नातेवाईकांच्या प्रतिक्रिया
आम्ही आमच्या नात्यातील व्यक्तीला दुसऱ्या आजाराच्या उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन आलो. कोरोनामुळे रुग्णाजवळ नातेवाईकांना राहू देत नाहीत. सोबतच रुग्णालयात कुणी कोणत्याही खुर्चीवर बसतो यामुळे आम्ही अख्खी रात्र रुग्णालयाच्या कोपऱ्यात बसून काढली. कोरोनाच्या दहशतीत माणुसकीे हिरावत चालली असे वाटते.
सखाराम मेंढे, रुग्णाचा नातेवाईक
......
वैद्यकीय महाविद्यालयात आम्ही आमच्या रुग्णाच्या उपचारासाठी आलो. आतमध्ये आमच्या रुग्णाकडे कुणी लक्ष देत नाही तर बाहेर आम्हालाही त्रास होतो. खिशात पैसे असूनही भूक शमविता येत नाही. कोरोनाच्या दहशतीने दुकाने बंद आहेत. खर्च करण्याची मानसिकता असली तरी एकही दुकान सुरु नाही.
मोहनलाल नेवारे, रुग्णाचा नातेवाईक
......
कोरोनामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की कसल्याही आजाराचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये जाण्यास बघत नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्यास परत घरी जाणार की नाही असे रुग्णांना वाटते. रुग्णांच्या सोबत हिंमत करून आलेल्या त्यांच्या नातेवाईकालाही त्रास सहन करावा लागतो. रुग्णालयाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी त्रासच आहे.
सुनील मडामे, रुग्णाचा नातेवाईक
.........
रुग्णाकडे जाता येत नाही बाहेरही काही मिळत नाही
कोविडचा संसर्ग वाढल्याने रुग्णालयात इतर आजारांच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक आले. कोरोनामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना सामान्य आजाराच्या रुग्णांजवळही राहू दिले जात नसल्याने मदतीसाठी आलेल्या नातेवाईकांना रुग्णालयाच्याच परिसरात परंतु वाॅर्डाच्या बाहेर रात्र घालवावी लागते. खायला काहीच बाहेर मिळत नाही. कोरोनामुळे सर्व प्रतिष्ठान बंद असल्याने आमची मोठी समस्या झाली असे रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत.