प्रकल्पग्रस्त आणि वनविभाग यांच्यातील संघर्ष पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:42 PM2019-02-26T21:42:30+5:302019-02-26T21:43:37+5:30
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा ईशारा प्रशासनाला दिला होता. यासंदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री ते वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा ईशारा प्रशासनाला दिला होता. यासंदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री ते वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते. मात्र प्रशासन आणि शासनाने कुठलीच दखल घेतली नाही. परिणामी श्रीरामपूर येथील व पूर्वाश्रमीचे कलवेवाडा, झंकारगोंदी, कालीमाती येथील गावकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह सोमवारी (दि.२५) सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या गावाकडे कूच केली. त्यांचे आंदोलन मंगळवारी (दि.२६) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.
दरम्यान गावकऱ्यांचा संताप लक्षात घेता वनविभागाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जंगलात जाण्याच्या प्रवेशद्वारावर ताराचे कुंपण करण्यात आले. सुमारे तीनशे पोलिस आणि वनविभागाचे शंभरावर कर्मचारी तैनात करण्यात आले. त्या प्रकल्पग्रस्तांना जंगलात जाण्याला मज्जाव करण्यात आला.
त्यामुळे दुपारी १२ वाजताच्या सुमारास तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रकल्पग्रस्तांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता तिथेच बस्तान मांडले. वरिष्ठ अधिकाºयांना बोलावून आधी मागण्यांची पूर्तता करा अन्यथा येथून हलणार नाही असा पावित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला.
त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दुपारी तीन वाजताच्या सुमारास गोंदियाचे उपवनसंरक्षक युवराज यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. परंतु, आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही आंदोलन करणार नसल्याचे सांगताच उपवन संरक्षकांनी देखील त्या मागण्या पूर्ण करणे आपल्या हातात नसल्याचे प्रकल्पग्रस्तांना सांगीतले.
त्यामुळे उपवनसंरक्षकांना देखील हतबल झाल्याने ही चर्चा विफल ठरली. कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यामुळे सायंकाळपर्यंत प्रकल्पग्रस्त नागरीक ठाण मांडून जंगलात बसले होते. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी (दि.२६) दुसºया दिवशी सुध्दा प्रकल्पग्रस्त आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते.
आंदोलनस्थळीच मुक्काम
श्रीरामपूर येथील व पूर्वाश्रमीचे कलवेवाडा, झंकारगोंदी, कालीमाती येथील गावकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह सोमवारी (दि.२५) आपल्या गावाकडे कूच केली.जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. अशी भूमिका घेतली. तसेच रात्रभर आंदोलन स्थळीच मुक्काम ठोकला. मंगळवारी दुसऱ्या दिवशी आंदोलनस्थळीच स्वंयपाक केला.
मुलाबाळांसह ६०० नागरिकांचा समावेश
श्रीरामपूर येथील महिला आणि पुरूषांनी आपल्या लहानग्या बाळांना घेवून आपल्या जंगलात असलेल्या गावाकडे निघाले होते.दिवसभर लहान मुले भूक आणि तहानेने व्याकूळ झाले होते. मात्र निगरगट्ट झालेल्या प्रशासनाने रस्ता अडवून धरला. मात्र लहान मुलांकरिता साध्या पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही.
गुन्हे दाखल करण्याची धमकी
श्रीरामपूरवासीयांनी टोकाची भूमिका घेत आंदोलन सुरू केले. तर निवडणुका सुध्दा तोंडावर आहेत. त्यामुळे प्रशासन आणि शासनाला सुध्दा चांगलाच घाम फुटला.आंदोलन दडपण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना गप्प रहा अन्यथा खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्याची धमकी वनविभागाचे अधिकारी देत असल्याचा आरोप श्रीरामपूर येथील गावकºयांनी केला आहे. सोमवारी (दि.२५) आपण आपल्या मूळ गावी परतणार असल्याचा ईशारा श्रीरामपूर येथील नागरिकांनी दिला होता. यातून प्रशासनाची नाचक्की होणार असल्याचे लक्षात येताच वनविभागाने पोलिसांचा बंदोबस्त लावला. सुमारे तीनशे पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते. गावात जाण्याच्या मार्गावर तारांचे कुंपन टाकून त्यांची वाट अडविण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
१२ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल
सडक अर्जुनी तालुक्यातील कालीमाती, झनकारगोंदी, कवलेवाडा या जंगलव्याप्त गावाचे पुर्वसन श्रीरामपूर येथे करण्यात आले. मात्र त्याठिकाणी प्रकल्पग्रस्तांना अद्यापही कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. मागील १२ वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या संयमाचा बांध फुटल्याने त्यांनी हे आंदोलनाचे पाऊल उचलले.