गोंदिया जिल्ह्यात प्रशासनाच्या मार्गदर्शनाअभावी व्यावसायिकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:59 AM2020-05-04T10:59:15+5:302020-05-04T11:00:17+5:30
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सोमवारपासून (दि.४) काही व्यवहारांना शिथिलता देण्याची घोषणा केली होती. मात्र या संदर्भातील नेमक्या मार्गदर्शक सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आल्या नाही. परिणामी प्रतिष्ठाने उघडण्यावर संभ्रम कायम होता. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारने विविध जिल्ह्यांचे ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन असे तीन विभागात विभाजन केले. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सोमवारपासून (दि.४) काही व्यवहारांना शिथिलता देण्याची घोषणा केली होती. मात्र या संदर्भातील नेमक्या मार्गदर्शक सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आल्या नाही. परिणामी सोमवारी शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्यावसायीकांमध्ये प्रतिष्ठाने उघडण्यावर संभ्रम कायम होता. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडली होती.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मागील दीड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यावसायीक प्रतिष्ठाने बंद आहेत.त्यामुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ ठप्प पडली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये पुन्हा १७ मे पर्यंत वाढ केली आहे. मात्र ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये काही व्यवहारांना शिथिलता देण्याची घोषणा केल्याने व्यावसायिकांसह नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची आशा होती. सोमवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत थोडी फार वर्दळ सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारपासून कुठली दुकाने, व्यवसाय सुरू करण्यास लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे, याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्यावसायिकांमध्ये सुध्दा यावरुन संभ्रम होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यावसायिकांसहना सूट देण्यात आली होती तीच दुकाने सोमवारी सकाळी उघडली होती. इतर वस्तूंची बाजारपेठ मात्र बंद होती. काही व्यावसायीक आपले प्रतिष्ठाने उघडण्यासाठी सकाळी आपल्या दुकानाजवळ पोहचले मात्र नेमक्या सूचना न मिळाल्या नसल्याने त्यांनी कारवाईच्या भीतीमुळे आपली दुकाने उघडली नव्हती. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाकडून अद्याप मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याने सध्या ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊन कालावधीतील सूचना लागू राहतील. नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच त्या त्वरीत लागू होणार असल्याचे सांगितले.