परीक्षा घेणारेच पेपर फोडतात; मग विश्वास ठेवायचा कुणावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 04:48 PM2021-12-21T16:48:57+5:302021-12-21T16:54:57+5:30
शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे.
गोंदिया : शिक्षक पात्रता परीक्षेत टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षक होता येत नसल्याने, अनेकांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टीईटी दोन वर्षांपासून रखडली होती. अखेर २१ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेत गैरव्यवहार झाल्याने तुकाराम सुपेला पोलिसांनी अटक केली. आता शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. प्राथमिक स्तरावरील पेपर-१ व माध्यमिक स्तरावरील पेपर-२ साठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन लाख आहे.
टीईटीसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी
३ लाख ४३ हजार
परीक्षा केंद्रे १४४३
पहिल्या पेपरसाठी केलेली नोंदणी २ लाख ५४ हजार ४२८
परीक्षा दिलेले २ लाख १६ हजार ६०४
दुसऱ्या पेपरसाठी नोंदणी केलेले २ लाख १४ हजार २५०
परीक्षा दिलेले १ लाख ८५ हजार ४३९
दोन वर्षांनी परीक्षा, त्यातही घोळ
राज्यात २०१३ पासून सहा वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे परीक्षा झाली नव्हती. त्यानंतर २१ नोव्हेंबरला दोन सत्रांत परीक्षा झाली. गैरप्रकार रोखण्यासाठी कार्बनलेस उतरपत्रिका वापरण्यात आल्या होत्या. मात्र, आता या परीक्षेत खुद्द आयुक्तांनीच घोळ निर्माण केल्याने आमचे काय? हा प्रश्न आहे.
आमचा काय दोष?
काेरोनामुळे टीईटी परीक्षा झाली नव्हती. आता ही परीक्षा दिली असून पेपरफुटी प्रकरणात जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई होईलच, पण यात आमचा काय दोष, आता आमचं काय, त्यावर तोडगा काढून शासनाने आम्हाला दिलासा द्यावा.
शीतल देशमुख, विद्यार्थिनी.
पेपर फुटला हे आम्हाला माहिती नाही. आम्ही अभ्यास करून परीक्षा दिली. अपात्र उमेदवारांच्या निकालात फेरफार करून पात्र ठरवले असेल, तर मेहनतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. असे ८०० उमेदवार अपात्र असल्याचे ‘लोकमत’च्या १९ डिसेंबरच्या वृत्तपत्रात वाचले. त्यांचा निकाल बदलला त्यावर कारवाई करावी, आमची चूक नसून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
सुनीता बोबडे.
२०२० मध्ये १६५९२ विद्यार्थी पात्र ठरले. उर्वरित विद्यार्थी व नवीन विद्यार्थी पुन्हा २०२१ च्या परीक्षेला बसले. मात्र, आता शिक्षकांच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याने अनेक प्रश्न फुटले. आमच्या सारखेच गरीब विद्यार्थ्यांचे नशीबच फुटले. शिक्षक होण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार का? असा प्रश्न पडला आहे.
चंदा हरिभाऊ पवार.