पालिकेच्या ढिसाळ काराभारावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:53 PM2018-07-20T23:53:27+5:302018-07-20T23:53:43+5:30
नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरून विरोधी पक्षातील सदस्यांसह पालिकेतील सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ घातला. सायंकाळपर्यंत केवळ मागील इतीवृत्तावरच ही सभा चालली. दरम्यान, सभागृहाच्या एकमताने बुधवारची (दि.१८) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरून विरोधी पक्षातील सदस्यांसह पालिकेतील सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ घातला. सायंकाळपर्यंत केवळ मागील इतीवृत्तावरच ही सभा चालली. दरम्यान, सभागृहाच्या एकमताने बुधवारची (दि.१८) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्यानंतर बुधवारी (दि.१८) सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आल्याची माहिती आहे. २५ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षातील कॉँग्रेस पक्षाचे सदस्य सुनिल भालेराव, सुनिल तिवारी, क्रांती जायस्वाल तर गोंदिया परिवर्तन आघाडीतील सदस्य पंकज यादव, लोकेश यादव यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सदस्य धर्मेश अग्रवाल व बंटी पंचबुद्धे यांनी चांगलाच गोंधळ घातल्याची माहिती आहे.
नगर परिषद प्रशासन योग्यरितीने काम करीत नसल्याने नगरसेवकांना शहरवासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.
विशेष म्हणजे, मागील सभेचे इतिवृत्त या पहिल्या क्रमांकाच्या विषयावरच सायंकाळी ५.३० वाजल्याची माहिती आहे. त्यानंतर मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या आजोबांचे निधन झाल्याने त्यांना कळले व त्यांना जावयाचे होते. त्यामुळे ही सभा सभागृहाच्या एकमताने तहकुब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोठ्या स्फोटाचे संकेत
सत्ताधारी पक्षातील एका सदस्याने सर्वसाधारण सभा होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळेच १७ महिन्यांच्या कार्यकाळात दुसरी सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८) घेण्यात आली. मात्र या सभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील सदस्यांनीच चांगलाच रोष व्यक्त केल्याची माहिती आहे. यावरून नगर परिषदेचा कारभार किती सुरळीत सुरू आहे, याची प्रचिती या सदस्यांनी आणून देत भाजपला घरचा आहेर दिला. हळूहळू वाढत चाललेला हा रोष मात्र भविष्यातील मोठ्या स्फोटाचे संकेत देत असल्याचेही नगर परिषद वर्तुळात बोलले जाते.