नियोजनाअभावी गोंदियात लसीकरण केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 06:17 PM2021-05-15T18:17:33+5:302021-05-15T18:18:49+5:30
Gondia News गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० केंद्रावर विशेष लसीकरण अभियान आयोजित केले होते. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. पण सकाळी ९.३० वाजतापर्यंत गोंविदपूर येथील केंद्रावर कर्मचारी न पोहचल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० केंद्रावर विशेष लसीकरण अभियान आयोजित केले होते. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. पण सकाळी ९.३० वाजतापर्यंत गोंविदपूर येथील केंद्रावर कर्मचारी न पोहचल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता.
स्थानिक प्रशासनाने शहरातील १० लसीकरण केंद्रावर शनिवारी विशेष लसीकरण मोहीम घेतली. यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या केंद्रावर लसीकरण केले जाईल असे प्रसिध्द पत्रक काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी शहरातील १० केंद्रावर सकाळी ८ वाजतापासूनच गर्दी केली होती. शहरातील गोंविदपूर येथे नगर परिषद शाळेत लसीकरण केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे या केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळी ८ वाजतापासूनच रांग लावली. पण केंद्रावर सकाळी ९.३० वाजेपर्यंत ऑपरेटरच न आल्याने नागरिकांचा चांगला गोंधळ उडाला. नागरिकांचा गोंधळ वाढल्यानंतर केंद्रावरील काही कर्मचाऱ्यांनी ऑपरेटरला बोलाविले. ऑपरेटर आला मात्र लाॅगिंग आयडी आणि पासवर्ड न मिळाल्याने लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. याच सर्व गोंधळात १० वाजल्याने सकाळपासून रांगेत असलेल्या नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला. यामुळे या केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान १०.१५ वाजताच्या सुमारास लॉगिंग झाल्याने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र या सर्व प्रकारामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
नियोजनचा अभाव
स्थानिक प्रशासनाने शनिवारी गोंदिया शहरातील नगर परिषद शाळा गणेशनगर, नगर परिषद शाळा गोविंदपूर, नगर परिषद हायस्कूल रामनगर, नगर परिषद गर्ल्स हायस्कूल अग्रसेन भवनजवळ, जे. एम. पटेल शाळा अवंती चौक, मालवीय स्कूल श्रीनगर, मनोहर म्युनिसिपल हायस्कूल स्टेडियमजवळ, नगर परिषद शाळा माताटोली, नगर परिषद शाळा रेलटोली गुजराती शाळेजवळ, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर या केंद्रावर लसीकरणाची सोय केली होती. यासाठी सकाळी ९ वाजताची वेळ देण्यात आली. पण ऑपरेटरच ९.३० वाजतापर्यंत केंद्रावर पोहचला नव्हता. तर लसीकरणाच्या संकेत स्थळाचे लाॅगिंग आयडी आणि पासवर्डचा घोळ कायम होता. एकंदरीत नियोजनाचा पूृर्णपणे अभाव होता.