अति आत्मविश्वासानेच काँग्रेसने उपाध्यक्षपद गमावले
By admin | Published: November 30, 2015 01:45 AM2015-11-30T01:45:50+5:302015-11-30T01:45:50+5:30
अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे उपाध्यक्षपद गमवावे लागले.
नगर पंचायत निवडणूक : ऐनवेळी स्वप्न भंगले
अमरचंद ठवरे अर्जुनी मोरगाव
अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे उपाध्यक्षपद गमवावे लागले. हा पराभव काँग्रेसला जिव्हारी लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
अध्यक्षपदावर काँग्रेसच्या पौर्णिमा शहारे अविरोध निवडून आल्या असल्या तरी, उपाध्यक्षपदावर पाणी फेरावे लागले. ऐनवेळी भाजपाचे विजय कापगते यांनी राजकारणाच्या सारीपाटावर यशस्वी खेळी खेळून उपाध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मान मिळविला. कालपर्यंत काँग्रेस अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतवर आपला ताबा कायम ठेवणार अशी परिस्थिती असताना ऐनवेळी भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या तिहेरी संगमाने काँग्रेसचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले. नियोजन व दांडगाव अनुभवाच्या नेतृत्वाच्या अभावाने काँग्रेसला पूर्णपणे सत्तेत राहण्यापासून वंचित राहावे लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जाते.
नगर पंचायतमध्ये भाजपा ६, काँग्रेस ६, राष्ट्रवादी २, शिवसेना १, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असल्याने इतर पक्षाकडे उमेदवारच नव्हते. परिणामी काँग्रेसच्या पौर्णिमा शहारे यांचा एकमेव अर्ज येऊन नगराध्यक्षपदी त्या विराजमान होणार हे जाहीर झाले होते. नवनिर्मित नगर पंचायतवर काँग्रेसचा पूर्णपणे ताबा राहण्यासाठी काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून गोंदिया दरबारातून व्युहरचना आखली होती. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला वगळून आवश्यक असलेले संख्याबळसुध्दा काँग्रेसने जमविले होते. दोन अपक्षांसह एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या पाठिब्याने नगर पंचायतवर सत्ता स्थापन्याचा काँग्रेसने चंग बांधला होता. इतरांच्या पाठिंब्याने काँग्रेसचे संख्याबळ ९ पर्यत पोहचले होते. आता नगर पंचायतच्या सत्तेपासून काँग्रेसला कोणी रोखू शकत नाही, असा अतिआत्मविश्वास काँग्रेस श्रेष्ठींना होता.
नगर पंचायतच्या सत्तेमधून राष्ट्रवादीला आऊट करण्याचा एकमेव ध्यास अंगिकारल्याने आज राष्ट्रवादीनेच काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखविल्याचे उपाध्यक्षाच्या निवडीवरून स्पष्ट दिसून येत आहे. आजघडीला भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी यांचे ९ नगरसेवक एकत्र येवून उपाध्यक्षपदाचा मुकुट भाजपाचे विजय कापगते यांच्या डोक्यावर चढविला गेला. यावरून काँग्रेसश्रेष्ठींनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. शेवटच्या दोन दिवसापूर्वी नगरात झालेल्या राजकीय हालचालींना काँग्रेसने मनावर घेतले नाही. मुत्सद्दी नेतृत्वाचा अभाव जाणवल्याने अखेरच्या क्षणी काँग्रेसचे स्वप्न भंगले.
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अर्जुनी-मोरगाव पं.स.सभापती, उपसभापती निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला बाजूला सारून भाजपाला साथ देऊन उपसभापतीपद काबीज केले. आजच्या नगर पंचायतच्या उपाध्यक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला साथ देऊन मागील हिशेब बरोबर केल्याचे बोलले जाते. एकंदरीत काँग्रेसी अर्जुनी-मोरगाव तालुक्यात संघटना मजबूत करण्यासाठी पोक्त विचारांच्या काँग्रेस कार्यकर्त्याला संधी देऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील असलेले रुसवे-फुगवे दूर करण्याचा पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता व्यक्त करीत आहेत.