काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे पाकिस्तानचे समर्थनपत्र, मोदी यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 10:21 PM2019-04-03T22:21:57+5:302019-04-03T22:24:35+5:30

या मुद्द्यावरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला.

Congress manifesto is Pakistan's letter of support, Narendra Modi's commentary on Congress | काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे पाकिस्तानचे समर्थनपत्र, मोदी यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे पाकिस्तानचे समर्थनपत्र, मोदी यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

Next

गोंदिया : काँग्रेसने जाहीर केलेले घोषणापत्र म्हणजे अतिरेक्यांचे समर्थन करणाऱ्या आणि अतिरेकी कारवायांना खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे समर्थनपत्रच असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथील मरारटोली येथील मैदानावर आयोजित जाहीरसभेत केली. या मुद्द्यावरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला.

आपल्या ३२ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी काँग्रेसच्या घोषणापत्राचा तब्बल दहा मिनिटे खरपूस समाचार घेतला. देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी प्रामाणिकपणे सांगावे की देशाशी विभागणी करण्याचा कट रचू पाहणा-या काँग्रेसचे त्यांना खरच समर्थन करावे काय याचे उत्तर त्यांनी जनतेल दिलेले बरे, देश विघात कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू नये, अशी भूमिका घेणा-या पक्षाचे तुम्ही समर्थन करता का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला.

सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट येथील अतिरेक्यांच्या कॅम्पवर हल्ला करून भारताला कमजोर समजण्याचे धाडस कुणीही करू नये असा इशारा या कारवाईतून पाकिस्तानला दिल्याचे मोदी यांनी आवर्जून सांगितले. मात्र भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-या लोकांना जनता या निवडणुकीतून नक्कीच धडा शिकवेल, असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सरकारने गेल्या ७० वर्षांत विकासाची तिजोरी रिकामी करून जे खड्डे तयार केले ते भरण्याचे काम आपण मागील पाच वर्षांत केले आहे. आता पुढील पाच वर्षांत विकासाचा हायवे तयार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. ही निवडणूक आपण लढत नसून देशातील नागरिक लढवित असल्याचा पुनरुच्चार त्यांनी गोंदिया येथील सभेत केला.

यंदाच्या निवडणुकीत महायुती महाराष्ट्रातून महामिलावटवाल्या आघाडीचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे गोंदियातील सभेने दाखवून दिले आहे. देशात फोफावत असलेल्या नक्षलवादावर बोलताना मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील माओवाद्याचे दिवस आता भरले आहेत. परंतु या देशाची धुरा जर अतिरेक्यांचे समर्थन करणा-यांच्या हाती दिली तर पुन्हा सामान्य नागरिकांच्या जीवावर उठेल. त्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडा-यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे नेते डॉ. दीपक सावंत, खा. डॉ. विकास महात्मे, आ.परिणय फुके, अनिल सोले, विजय रहांगडाले, बाळा काशिवार, संजय पुराम , माजी खा.खुशाल बोपचे, प्रदीप पडोळे, उमेदवार सुनील मेंढे, माजी आ.केशव मानकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गिरीश व्यास, उपेंद्र कोठेकर, माजी मंत्री गौरीशंकर बिसेन, माजी.खा.शिशुपाल पटले, खा.बोधसिंह भगत, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
..............
कप्तानानंतर उपकप्तानाची ही माघार
लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कप्तानाने माघार घेतली तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणातून उपकप्तानाने माघार घेतली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली. ते म्हणाले धान उत्पादकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे काम महाराष्ट्रतील भाजप सेना युती सरकारने अतिशय प्राणाणिकपणे केले आहे. सिंचन प्रकल्पांसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील नझुल पट्टेधारकांचा विषय असो की धानाला ५०० रुपये बोनस देण्याचे काम असो असे अनेक जनहिताचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहे. आघाडी शासनाच्या कारर्किदीत जेवढी धान खरेदी झाली नाही, त्याहून पाचपट अधिक धान खरेदी युती सरकारच्या काळात झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

Web Title: Congress manifesto is Pakistan's letter of support, Narendra Modi's commentary on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.