शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसने काढली पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:24 AM2021-02-20T05:24:59+5:302021-02-20T05:24:59+5:30
गोंदिया : केंद्र शासनाने शेतकरी व शेतीविषयक पारित केलेले तीन कायदे रद्द करण्यात यावेत, यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ...
गोंदिया : केंद्र शासनाने शेतकरी व शेतीविषयक पारित केलेले तीन कायदे रद्द करण्यात यावेत, यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीकडून गुरुवारी (दि. १८) पदयात्रा काढण्यात आली. गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून सकाळी ९ वाजता ही पदयात्रा निघाली.
केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्यांना घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यानंतरही हे कायदे मागे घेण्यात आलेले नाहीत. अशात काँग्रेसनेही या शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले असून, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. यातूनच शेतकऱ्यांना आपले समर्थन देत गुरुवारी (दि. १८) पदयात्रा काढण्यात आली आहे. ही पदयात्रा गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून निघाली ती हिरडामाली - तुमखेडा- कारंजा - फुलचूर होत दुपारी गोंदिया शहरात पोहोचली. पदयात्रेचा समारोप दुपारी ३ वाजता येथील उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते यांना निवेदन देऊन करण्यात आला.
या पदयात्रेत ट्रॅक्टरचाही समावेश होता. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तयार केलेले तिन्ही काळे कृषी कायदे रद्द करावेत, सद्यस्थितीत गगनाला भिडलेले डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या पदयात्रेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान, आमदार सहसराम कोरोटे, पी. जी. कटरे, गप्पू गुप्ता, प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वऱ्हाडे, योगेंद्र भगत, राधेलाल पटले, ममता पाऊलझगडे, रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी, जितेंद्र कटरे, नीलम हलमारे, ॲड. योगेश अग्रवाल, निकेश मिश्रा व शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता.