कॉँग्रेसने गड राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:53 PM2019-06-24T21:53:36+5:302019-06-24T21:54:00+5:30
सर्वांच्या नजरा लागून असलेल्या तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने आपला गड राखला. निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे यांना ८८४ मतांनी पराजीत करून विजय मिळविला. यामुळे कॉँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्वांच्या नजरा लागून असलेल्या तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने आपला गड राखला. निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे यांना ८८४ मतांनी पराजीत करून विजय मिळविला. यामुळे कॉँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आसोली जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य शेखर पटले यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे, कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे, शिवसेनेचे उमेदवार गजानन महारवाडे व अपक्ष उमेदवार ओंकार उके रिंगणात होते. रविवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या मतदानात ७३.४० टक्के मतदान झाले. निवडणुकीत क्षेत्रातील १२ हजार ८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.२४) येथील प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे सुरजलाल महारवाडे यांनी भाजपचे परसराम हुमे यांचा ८८४ मतांनी पराभव केला आहे.
निवडणुकीत कॉँग्रेसचे सुरजलाल महारवाडे यांनी सहा हजार २२३, भाजपचे परसराम हुमे यांनी पाच हजार ३३९, शिवसेनेचे गजानन महारवाडे यांनी ३०३ तर अपक्ष उमेदवार ओंकार उके यांनी १०२ मते घेतली.
निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे तर कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांच्यात थेट लढत झाली. तरी शिवसेनेचे उमेदवार यांनी भाजपला मात्र युती धर्म न पाळल्याचा सबक शिकविल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतदारसंघातील आघाडीवर सुद्धा या पोटनिवडणुकीने प्रश्न चिन्ह उपस्थित होते.
विशेष म्हणजे, मतदान प्रक्र ीया सुरू असताना क्षेत्रातील ग्राम मोरवाही येथे दोन्ही पक्षाच्या गोंदिया येथील कार्यकर्त्यांना बघून गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. निवडणूक अधिकारी व प्रभारी उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र दिले.
माहुरकुडात भैसारे विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील माहुरकुडा पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानात कॉँग्रेसने गड राखला असून पक्षाचे उमेदवार संघदीप भैसारे विजयी झाले. विजयानंतर तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून पेढे भरविले.
माहुरकुडा पंचायत समिती सदस्य नानाजी मेश्राम यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर येथे रविवारी (दि.२३) निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महालगाव, तावशी, मोरगाव, निलज, माहुरकुडा, मालकनपूर व सिरोली येथील सात हजार ३५७ मतदारांपैकी चार हजार ७६८ मतदारांनी मतदान केले.
मतदानाची टक्केवारी ६४.८१ होती. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप व बहूजन वंचीत आघाडी या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. यात काँग्रेसचे संघदीप भैसारे यांना एक हजार ९८१, भाजपचे दिनेश शहारे यांना एक हजार ५८७ तर बहूजन वंचित आघाडीचे अजय बडोले यांना एक हजार १५५ मते मिळाली व भैसारे यांचा ३९४ मतांनी विजय झाला.
भैसारे यांच्या विजयासाठी जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल व तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे यांनी परिश्रम घेतले. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, तहसीलदार विनोद मेश्राम, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील भांडारकर यांनी ही निवडणूक यशस्वीरित्या हाताळली. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अर्जुनी-मोरगार तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप आघाडीवर होती. तर केवळ माहुरकुडा जिल्हा परिषद क्षेत्रात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यात या पोटनिवडणुकीतही काँग्रसने आघाडी कायम ठेवत गड राखला.