प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता एसटीचे केले जातेय वारंवार सॅनिटाईजेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 05:00 AM2021-06-04T05:00:00+5:302021-06-04T05:00:05+5:30
आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत असल्याचे बघून राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. परिणामी एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली असून हळूवारपणे तिला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगारांकडून एसटीची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे. प्रत्येक फेरीनंतर एसटी आगारात येताच तिची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागला होता व त्यामुळे सर्वच काही ठप्प पडले होते. याचा फटका राज्य रस्ते परिवहन महामंडळालाही दुसऱ्यांदा सहन करावा लागला असून महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या आगारांचाही समावेश असून या दोन्ही आगारात एसटी मागील सुमारे दीड महिन्यापासून स्थानकातच उभ्या होत्या. परिणामी दोन्ही आगार कोट्यवधींच्या नुकसानीत गेले आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले, त्यात प्रवास पूर्णपणे बंद होता. यामुळे एसटी स्थानकात प्रवाशांची वाट बघत उभी राहिली.
आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत असल्याचे बघून राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. परिणामी एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली असून हळूवारपणे तिला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगारांकडून एसटीची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे. प्रत्येक फेरीनंतर एसटी आगारात येताच तिची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे, हे विशेष.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे बाहेरगावी ये-जा सुरु झाली आहे. त्यामुळे बससेस मध्ये सुध्दा आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र महामंडळांची आर्थिक गाडी अद्यापही रुळावर आली नसल्याने चिंता कायम आहे.
प्रत्येक फेरीनंतर एसटीचे सॅनिटाईजेशन
- एसटीचा प्रवास सुरू झाला असून प्रवाशांचा हळूवार प्रतिसाद मिळत आहे. अशात आगारांकडून प्रवासी सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. यासाठी प्रत्येक फेरीनंतर एसटीची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे. चालक-वाहकांना मास्क बंधनकारक असतानाच प्रवाशांनाही मास्क घालूनच प्रवेश दिला जात आहे. प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा असे असतानाच ते सुरक्षित रहावे याकडेही आगारांकडून लक्ष दिले जात आहे.
सुमारे ५ कोटींचा झाला तोटा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करावा लागला असून याचा फटका आगारांना चांगलाच बसला आहे. मागील सुमारे दीड महिन्यापासून एसटी स्थानकातच उभी असल्याने गोंदिया आगाराचे या काळात सुमारे ३.५० कोटींचे तर तिरोडा आगाराचेही सुमारे १.५० कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.
नागरिकांनी प्रवास पूर्णपणे टाळला
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड जीवहानी केली आहे. जिल्ह्यातील ती परिस्थिती बघता आता नागरिकांत दहशत बसली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळल्याचेही दिसत आहे. अशात नागरिकांनी प्रवासावर पूर्णपणे बंदीच घातली आहे. परिणामी एसटी स्थानकात तयार उभी असतानाही प्रवासी नसल्याने तिला तसेच उभे रहावे लागत असल्याचे दिसले. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने कामानिमित्त नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरूवात केली असून थोडाफार प्रतिसाद मिळत आहे.
नागपूर मार्गावर सर्वाधिक वाहतूक
- गोंदिया आगारातील सर्वाधिक फेऱ्या नागपूर मार्गावर धावतात. नागपूर मार्गावर मधात भंडारा जिल्हा येत असून त्यानंतर नागपूर येते. जिल्हा निर्मितीपूर्वी गोंदिया भंडारा जिल्ह्यातच होता व आजही कित्येक कार्यालयांचा कारभार भंडारा येथूनच चालतो. तसेच नागपूर येथे बहुतांश विभागांचे मुख्य कार्यालय असून याशिवाय शिक्षण, उपचार, खरेदी व कार्यालयीन कामकाजासाठी नागरिकांना नागपूर येथे जावे लागते. तसेच अपडाऊन करणारे कर्मचारीही असल्याने वर्षभर या मार्गावर वाहतूक असते. तिरोडा आगाराच्या एसटीही नागपूर तसेच गोंदिया मार्गावर धावत आहेत.
लालपरी रस्त्यावर निघाल्याने दिलासा
मागील सुमारे दीड महिन्यापासून लालपरी स्थानकातच होती. यामुळे आगाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या लालपरीवरच आमचा उदरनिर्वाह असून आता लालपरी पुन्हा रस्त्यावर निघाल्याने आनंद होत आहे. आमची ड्यूटी पुन्हा सुरू झाली असून आता पगाराचीही समस्या सुटणार.
- अरूण तुरकर (चालक)
लॉकडाऊनमुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मागील वर्षी सुद्धा हीच स्थिती निर्माण झाली होती. एसटी स्थानकातच उभी राहत असल्याने बरे वाटत नव्हते. आता एसटी पुन्हा रस्त्यावर उतरली असून तिचा प्रवास करता येणार आहे. उत्पन्न येणार असल्याने पगाराचा प्रश्नही सुटणार.
- श्यामा मेश्राम (वाहक)