विद्यार्थ्यांची ईबीसी सवलत बंद पाडण्याचे षड्यंत्र
By admin | Published: May 21, 2017 01:55 AM2017-05-21T01:55:11+5:302017-05-21T01:55:11+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्रमांक (प्र.क्र.-२२१ इबीसी-२०१६ दिनांक ३१ मार्च २०१६) अन्वये
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्रमांक (प्र.क्र.-२२१ इबीसी-२०१६ दिनांक ३१ मार्च २०१६) अन्वये शासनाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सीएपी) पूर्ण केल्यानंतर थेट द्वितीय वर्षात पदविका अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी ईबीसी सवलतीसाठी पात्र असतात. शासनाचे असे स्पष्ट परिपत्रक असूनसुद्धा तंत्रशिक्षण संचालनालय विभागाकडून विद्यार्थ्यांना सवलतीपासून वंचित केले जात आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
साखरीटोला येथील विद्यार्थी मोहितकुमार संतोष अग्रवाल याने बारावीनंतर सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रात लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलीटेक्निक आमगाव येथे थेट द्वितीय वर्षात मॅकेनिकल शाखेत प्रवेश घेतला होता.
ईबीसी सवलतीकरिता लागणारे सर्व कागदपत्र त्याने सादर केले होते. त्यास द्वितीय वर्षात इबीसी सवलत मिळाली, परंतु तृतीय वर्षात परीक्षेचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याची ईबीसी सवलत रद्द करण्यात आल्याची सूचना विद्यालयाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांचे पालक ईबीसी सवलतीकरिता पात्र असतानासुध्दा अचानक सवलत रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
विद्यार्थ्याच्या पालकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ते विद्यालयाची फीस भरून मुलांना शिक्षण देऊ शकत नाही.
तसेच प्रद्युम्न संतोष अग्रवाल या विद्यार्थ्याने बारावीनंतर याच महाविद्यालयात शासनाच्या प्रक्रियेनुसार डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरींगच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतला आहे. शासन नियमानुसार इबीसी सवलत मिळण्याचे सर्व कागदपत्रे त्याने विद्यालयात सादर केले आहेत. मात्र सहसंचालक तंत्रशिक्षण संचालनालय नागपूर यांनी सदर अर्जावर सवलत देण्यास नकार दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आ. संजय पुराम व सहसंचालक तंत्रशिक्षण संचालनालय नागपूर यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. तसेच पालकांनी नागपूर कार्यालयात जाऊन सहसंचालक ठाकरे यांची भेट घेतली व आपली परिस्थिती सांगितली. पण अजूनपर्यंत ईबीसी सवलतीचे समाधान काढण्यात आले नाही.
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी मिळून इबीसी सवलतीबाबत विद्यार्थ्यांचे समाधान काढावे अन्यथा असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्वरित समाधान करण्याची मागणी संतोष अग्रवाल, रमेश चुटे, प्रा. सागर काटेखाये, डॉ. संजय देशमुख, सुनील अग्रवाल, प्रभाकर दोनोडे, डॉ. अजय उमाटे, पृथ्वीराज शिवणकर, प्रदीप अग्रवाल, सजय कुसराम, भुमेश्वर मेंढे, शामलाल दोनोडे यांनी केली आहे.